विटा : आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक असलेल्या संशयिताला गुन्ह्यात मदत करण्यासाठी व वाढीव पोलीस कोठडी न घेण्यासाठी एक लाख रुपयांची लाच घेतल्याच्या प्रकरणातील फरार सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पोपट झालटे यांच्या अटकेसाठी पोलिसांची दुसऱ्या दिवशीही शोध मोहीम सुरू होती; परंतु झालटे पोलिसांच्या हाती सापडले नाहीत. दरम्यान, शुक्रवारी लाचलुचपत विभागाच्या पथकाने पोलीस शिपाई विवेक यादव याच्यासह एका पंटरला अटक केल्याने नेहमी पोलीस ठाणे आवारात फिरणारे अन्य बरेच पंटर शनिवारी अचानक गायब झाले.
सांगलीच्या लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक प्रशांत चौगुले यांच्यासह त्यांच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी विटा पोलीस ठाण्यात सापळा लावून एक लाख रुपयांची लाच घेताना पोलीस शिपाई विवेक यादव, पंटर अकीब तांबोळी या दोघांना रंगेहात पकडले होते. या प्रकरणातील सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप झालटे फरार झाले होते.
शनिवारी त्यांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषणसह पोलीस पथकाने ठिकठिकाणी छापे टाकले; परंतु ते पोलिसांच्या हाती लागले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी त्यांची शोधमोहीम युद्धपातळीवर सुरू ठेवली आहे.