विटा : अडत व्यापारासाठी येथील खासगी सावकाराकडून घेतलेले कर्ज परत देण्यासाठी तगादा लावून मानसिक त्रास दिल्याने अडत व्यापारी सुहास केदारी गिड्डे (वय ३०, रा. विटा) या तरुणाने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. याप्रकरणी विटा पोलिसांनी अटक केलेल्या ऋषिकेश मधुकर म्हेत्रे (३०, रा. विटा) या खासगी सावकाराच्या अन्य चार ते पाच साथीदारांची शोधमोहीम पोलिसांनी सुरू केली आहे. ऋषिकेश म्हेत्रे याची कसून चौकशी सुरू आहे.
विटा येथील सुहास गिड्डे याने अडत व्यापारासाठी ऋषिकेश म्हेत्रे या खासगी सावकाराकडून एक लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. लॉकडाऊन व अन्य कारणांमुळे व्यवसायात नुकसान झाले. त्यामुळे तो सावकाराचे कर्ज परत देऊ शकला नाही. त्यामुळे सावकार म्हेत्रे याने एक लाख रुपयांचे दोन लाख आठ हजार रुपये झाल्याचे सांगून ते पैसे परत देण्यासाठी गिड्डे याच्यापाठीमागे ससेमिरा लावला होता.
सावकार म्हेत्रे, त्याचा सहकारी राहुल जाधव व त्याचे अन्य तीन ते चार साथीदारांनी गिड्डे यास धमकावून मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे या त्रासाला कंटाळून गिड्डे याने विट्यात विषारी द्रव्य प्राशन केले. त्यास सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचार सुरू असतानाच गेल्या चार दिवसांपूर्वी गिड्डे याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी गिड्डे याचा भाऊ निवास यांनी खासगी सावकार ऋषिकेश म्हेत्रे, राहुल जाधव यांच्यासह अन्य अनोळखी तीन ते चार साथीदारांनी सुहास याला त्रास दिल्याने त्याने आत्महत्या केल्याची फिर्याद मंगळवारी रात्री विटा पोलिसांत दिली.
याप्रकरणी पोलिसांनी मुख्य सूत्रधार संशयित सावकार ऋषिकेश म्हेत्रे यास अटक केली आहे, तर राहुल जाधव याच्यासह अन्य साथीदार फरार झाले आहेत. या सर्वांचा शोध घेण्याची मोहीम सुरू केली असून, सावकार म्हेत्रे याचीही पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. पोलीस निरीक्षक पी.पी. झाल्टे पुढील तपास करीत आहेत.