सांगली : पक्षांतर्गत माझ्याविषयी काहीजण जाणीवपूर्वक संशयास्पद वातावरण निर्माण करीत आहेत. सोशल मिडियावर पोस्ट टाकण्यापासून स्थानिक पातळीवर वेगळ््या चर्चा करण्याचा प्रयत्न काही लोक करीत आहेत. त्यांचा आम्ही शोध घेऊ, असे खासदार संजयकाका पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.ते म्हणाले की, पक्षांतर्गत गटबाजीचे राजकारण नाही, मात्र काहीजण संशयास्पद वातावरण तयार करताहेत, ही गोष्ट खरी आहे. आम्ही त्या गोष्टीच्या मुळाशी जाऊ. सुरेश खाडे यांनी कोणतेही गैर वक्तव्य केलेले नाही. कोणाचीच उमेदवारी निश्चित नसल्याने त्याबद्दल ठामपणे सांगणे योग्य नाही. खाडे यांनी केलेले वक्तव्य आकसबुद्धितून नाही.
पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी यापूर्वी बऱ्याचदा जाहीर सभांमध्ये माझ्या उमेदवारीची घोषणा केली असली तरी त्यांना तो अधिकार आहे, पण स्थानिक नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना अशाप्रकारच्या गोष्टी जाहीर करता येत नाहीत. पक्षाकडे मी रितसर उमेदवारीची मागणी केली आहे. माझे पाच वर्षातील काम चांगले असल्याने मी त्याबद्दलचा दावा केला आहे.
माझ्यासह अनेकजण खासदारकीच्या उमेदवारीसाठी इच्छुक असू शकतात. लोकशाही मार्गाने त्यांनी उमेदवारी मागणे यात गैर काही नाही. सर्वच पक्षातील लोकांशी माझे चांगले संबंध असल्याने त्याचा फायदा पक्षाला मतांच्या माध्यमातून होऊ शकतो.तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात माझे अधिक लक्ष असल्याबद्दल चर्चा होत असली तरी मतदारसंघात सर्वत्रच माझा संपर्क आहे. तासगाव-कवठेमहांकाळच्या जनतेने माझ्या राजकीय जडणघडणीत मोठी साथ दिली आहे. त्यामुळे या भागाविषयी प्रेम असणे स्वाभाविक आहे. राजकीय पेरणी म्हणून याठिकाणी मी कधीही लक्ष घातलेले नाही. त्यामुळे त्याअर्थाने कोणी येथील कामांकडे पाहू नये.घोरपडेंशी माझी चर्चाअजितराव घोरपडे हे भाजपचेच आहेत. त्यांच्यात आणि माझ्यात कोणतेही मतभेद नाहीत. पक्षाबद्दलच्या नाराजीची चर्चाही चुकीची आहे. काही दिवसांपूर्वीच आम्हा दोघांमध्ये चर्चा झालेली आहे. त्यांमुळे ते वेगळी राजकीय भूमिका घेऊन जात असल्याबद्दलची चर्चा चुकीची आहे, असे संजयकाका पाटील म्हणाले.गर्भगळीत होणारा कार्यकर्ता नाही!पक्षांतर्गत कोण काय म्हणत असतो, कोणत्या चर्चा पसरविल्या जात असतात, याकडे मी फारसे लक्ष देत नाही. अशा गोष्टींमुळे गर्भगळीत होणारा मी कार्यकर्ता नाही. विकासकामांच्या माध्यमातून माझे नाणे खणखणीत केले आहे.