सांगली : केंद्रीय गृह विभागाच्या आदेशाने हरविलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी यावर्षीही मोहीम सुरु केली आहे, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मीकांत पाटील यांनी दिली. नव्या वर्षात दि. १ ते ३१ जानेवारी यादरम्यान सांगली, मिरजेसह संपूर्ण जिल्ह्यात ही मोहीम राबविली जाणार आहे. ‘आॅपरेशन स्माईल’ असे या मोहिमेस नाव दिले आहे, असेही पाटील यांनी सांगितले.ते म्हणाले, जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी, पोलीस उपअधीक्षक (गृह) रावसाहेब सरदेसाई, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविली जाणार आहे. ‘आॅपरेशन स्माईल’ मोहिमेत रेल्वे स्टेशन मुख्य बसस्थानक, रस्त्यावर भीक मागत फिरणारी अथवा वस्तू विकणारी बालके, कचरा गोळा करणारी मुले, तसेच धार्मिक स्थळे, रुग्णालये, हॉटेल्स, दुकाने आदी ठिकाणी दिसणाऱ्या मुलांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले जाईल. त्यांची चौकशी केली जाईल. त्यांच्या पालकांचा शोध घेऊन या मुलांना त्यांच्या ताब्यात दिले जाईल. काम करणाऱ्या मुलांनाही, हरविलेली मुले, असे समजून त्यांना पालकांच्या ताब्यात दिले जाईल. ते म्हणाले, मोहीम राबविण्यास जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, बालसुधारगृहे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, ‘सेव्ह द चिल्ड्रन’ संस्था, सहायक कामगार आयुक्त, बालकल्याण समिती व सामाजिक कार्यकर्त्यांची मदत घेतली जाणार आहे. त्यामुळे ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यास मदत होईल. नागरिकांनीही या मोहिमेत सहभागी होऊन, कुठे लहान मुले घाबरलेल्या स्थितीत दिसून आल्यास किंवा भीक मागताना दिसून आल्यास नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती द्यावी. (प्रतिनिधी)४८ मुले सापडलीगतवर्षी ‘आॅपरेशन मुस्कान’ मोहीम राबविली होती. या मोहिमेंतर्गत ४८ मुलांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले होते. ज्या मुलांचे नातेवाईक मिळून आले नाहीत, त्या मुलांना निरीक्षण गृहात दाखल केले होते.
हरविलेल्या मुलांचा घेणार शोध!
By admin | Published: January 05, 2016 12:58 AM