सांगली : जिल्ह्यातील यंदाचा द्राक्ष हंगाम ८५ टक्के उरकला आहे. निर्यातक्षम द्राक्षाला सुरुवातीला अपेक्षित दर मिळाला नाही. मात्र नंतर चांगला दर मिळाला. स्थानिक बाजारात योग्य दर न मिळाल्यामुळे ३५ हजार एकर क्षेत्रातील शेतकरी बेदाण्याकडे वळले आहेत.जिल्ह्यात यंदा पाऊसमान कमी झाल्याने टँकरच्या पाण्याने बागा जगविण्यात आल्या. फळछाटणी एकाचवेळी झाली. फळधारणाही चांगली झाली. रोगांचा प्रादुर्भाव झाला नाही. बाजारात द्राक्षे एकाच वेळी आली. त्यानंतर थंडी आणि पाऊस यामुळे मालाला दक्षिणेतून मागणी वाढली नाही. त्याचा परिणाम दरावर झाला. सुरुवातीला चार किलोची पेटी २५० रुपयांना विकली गेली. नंतर मात्र १५० रुपयांपर्यंत घसरण झाली. द्राक्षाला अपेक्षित दर नसल्याने द्राक्षविक्री करण्याऐवजी बेदाणा तयार करण्याकडे शेतकरी वळले आहेत. बेदाण्यासाठी सुमारे ३५ ते ४० हजार एकर क्षेत्रातील द्राक्षांचा वापर झाला. उत्पादन चांगले झाले असले तरी, दर तुलनेने कमीच राहिला, अशी माहिती बागायतदार महादेव पाटील यांनी दिली. सध्या बेदाण्याला प्रतिकिलोस १९० ते २२५ रुपये असा दर मिळत आहे. त्यामुळे बेदाण्याच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता असल्याचेही पाटील यांनी सांगितले.जिल्ह्यातील दहा ते पंधरा टक्के द्राक्षाची काढणी शिल्लक आहे. दरात प्रतिकिलोस २० ते २५ रुपयांची वाढ झाली आहे. परंतु जिल्ह्यात द्राक्षे ठेवण्यासाठी शीतगृहांची संख्या कमी आहे. जी शीतगृहे आहेत, त्यामध्ये बेदाणा ठेवला जातो. त्यामुळे सध्या व्यापाऱ्यांनी द्राक्षाची खरेदी करून ती शीतगृहात ठेवली आहेत. याचा फायदा थेट व्यापाऱ्यांना होणार आहे. काही शेतकºयांनीही २० ते २५ टनाहून अधिक द्राक्षे शीतगृहात ठेवली आहेत.शीतगृहांची संख्या वाढवा : अभिजित जाधवएकाचवेळी द्राक्षांची काढणी सुरू झाल्यानंतर बाजारपेठेत लगेच द्राक्षाचे दर कमी होतात. काहीवेळा अवकाळी पाऊस झाल्यानंतर व्यापारीही द्राक्षांचे दर कमी करून खरेदी करतात. यावर उपाय म्हणजे शासनानेच द्राक्षाची साठवणूक करण्यासाठी शीतगृहे उभा करण्याची गरज आहे. दर नसेल तेव्हा शेतकरी द्राक्षाची छाटणी करून शीतगृहामध्ये ठेवू शकतो, अशी प्रतिक्रिया द्राक्षबागायतदार अभिजित जाधव यांनी दिली.
जिल्ह्यातील ८५ टक्के द्राक्षाचा हंगाम उरकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 11:39 PM