जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत बरखास्तीच्या प्रस्तावावरून सदस्यांनी सभागृहात हंगामा केला.
फोटो २२ सांगली झेड पी १
सदस्यांनी व्यासपीठावर जाऊन चंद्रकांत गुडेवार यांना जाब विचारला.
छाया : सुरेंद्र दुपटे
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्हा परिषदेत सदस्य आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांच्यात काही महिन्यांपासून सुरू असणाऱ्या संघर्षाचा शुक्रवारी विस्फोट झाला. सर्वसाधारण सभेत सदस्यांनी गुडेवारांविरोधात हल्लाबोल केला. जिल्हा परिषदेच्या बदनामीचा आरोप करत त्यांना शासनाकडे परत पाठविण्याची मागणी केली.
सुमारे दोन तास हल्लकल्लोळ सुरू होता. गुडेवारांविरोधात सदस्यांनी सभागृह डोक्यावर घेतले. दुपारी एक वाजता सुरू झालेल्या सभेत तीन वाजले तरी गुडेवार यांच्यावर कारवाईविषयीच घमासान चर्चा सुरू होती. अपेक्षेप्रमाणे सभेच्या सुरुवातीलाच हा विषय उपस्थित झाला. २६ ऑक्टोबरच्या सभेत सदस्यांच्या शिफारशीनेच कामे वाटपाचा ठराव झाला होता. तो बेकायदेशीर ठरवत गुडेवार यांनी संपूर्ण जिल्हा परिषदच बरखास्तीचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठविला. त्यामुळे सदस्यांनी हंगामा केला. गेल्या सभेतील ध्वनिमुद्रण ऐकवत शिफारशीचा ठरावच झाला नसल्याचा दावा केला.
सभेचे सचिव उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे यांनी ठराव झाल्याचे व त्यावर अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांची सही असल्याचे स्पष्ट केले. पण कोरे यांनी सावध पवित्रा घेत ठरावावर अनवधानाने सही झाल्याचे सांगितले. ठराव नियमबाह्य असल्यास तशी कल्पना द्यायला हवी होती असे सांगत प्रशासनावरच बाजू ढकलली. सदस्यांनीही त्यांची बाजू उचलत ठराव बेकायदेशीर असेल तर प्रशासनाने विखंडितसाठी कार्यवाही करायला हवी होती, असा दावा केला. त्याऐवजी बरखास्तीचा प्रस्ताव केल्याने महाराष्ट्रभरात बदनामी झाल्याचा आरोप केला.
सुहास बाबर, डी. के. पाटील, जितेंद्र नवले, सुषमा नायकवडी, शिवाजी डोंगरे, संपतराव देशमुख, अर्जुन पाटील, संभाजी कचरे, ब्रह्मानंद पडळकर, अरुण बालटे, प्रमोद शेंडगे, संजय पाटील, रवी पाटील, सरदार पाटील, अरुण राजमाने, सुरेंद्र शिराळकर, सतीश पवार, आशा पाटील, सुनीता पवार, जितेंद्र पाटील, जगन्नाथ माळी आदींनी गुडेवारांविरोधात एकमुखी हल्लाबोल केला. आम्ही राजीनामे देतो, प्रशासनानेच जिल्हा परिषद चालवावी, असे आव्हान दिले. महिला सदस्यांसह सर्वच व्यासपीठाकडे धावले. गुडेवार यांच्यावर सरबत्ती केली. आपल्या प्रस्तावावर गुडेवार ठाम राहिले. बेकायदेशीर ठरावामुळेच बरखास्तीचा ठराव कायदेशीर तरतुदींनुसार सीईओंकडे पाठविल्याचे स्पष्ट केले. यावर सदस्य संतापले. गुडेवार सूडबुद्धीने वागत असल्याचे सुहास बाबर म्हणाले. ते सभागृबाहेर जाईपर्यंत सभा रोखण्याची मागणी केली. त्यांना शासनाकडे परत पाठविण्याची मागणी उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे यांनी केली. ते जिल्हा परिषदेच्या अधिकारात नसल्याचे स्पष्ट होताच सक्तीच्या रजेवर पाठविण्याची मागणी सदस्यांनी केली. तेदेखील शक्य नसल्याने शिस्तभंगाच्या कारवाईवर एकमत झाले. विविध दहा आरोप ठेवत, अशी कारवाई करण्याचा निर्णय झाला. त्यानंतरच सभेचे पुढील कामकाज सुरू झाले.
चौकट
म्हैसाळ ग्रामपंचायत निवडणुकीचा दावा
म्हैसाळमध्ये ग्रामपंचायत निकालाचा विषय गुडेवार यांच्यासमोर काढला असता ‘मी प्रचाराला गेलो असतो तर राष्ट्रवादीचे दोन सदस्यही निवडून आले नसते’ अशी प्रतिक्रिया गुडेवार यांनी व्यक्त केल्याचा आरोप सदस्यांनी केला. भिलवडीमध्येही चौकशी लावून ग्रामपंचायत घालवल्याचे सदस्य म्हणाले. या आरोपांवर गुडेवार यांनी मौन बाळगले.
चौकट
सभेतील अन्य ठराव असे
- मिरज जंक्शनला महात्मा बसवेश्वरांचे नाव देण्याचा ठराव रवी पाटील यांनी मांडला.
- बाणुरगडावरील बहिर्जी नाईक समाधी, स्वतंत्रपूर कारागृहासाठी रस्ता, गदिमांच्या शेटफळे व माडगुळे येथील स्मारकांसाठी निधीचा ठराव ब्रह्मानंद पडळकर यांनी केला.
- डोंगरी विकास योजनेतील निधी सदस्यांना समसमान देण्यावर संभाजी कचरे ठाम राहिले. बांधकाम सभापती माळी यांनी मागितला होता; पण कचरे यांनी तीव्र विरोध केला.
- जिल्हा परिषदेच्या सर्व गाळ्यांचे कोरोनाकाळातील चार महिन्यांचे भाडे माफ करण्याचे ठरले, तत्पूर्वी मार्चपर्यंतची थकबाकी भरली पाहिजे अशी अट घातली.
- सुमारे २२५ कोटींच्या विविध कामांचे प्रस्ताव नियोजन समितीकडे पाठविण्याला मंजुरी देण्यात आली.
- शंकरराव खरातांचे घर व सूर्योपासना मंदिरासाठी निधीची मागणी पडळकर यांनी केली.
---------