सावकारी कर्जवसुलीसाठी म्हैसाळ येथील अशोक कोरवी यांच्या कुटुंबाला धमकावल्याबद्दल धुमाळ पिता-पुत्राला पोलिसांनी अटक केली आहे. सावकारी कर्जवसुलीसाठी त्यांनी अनेकांची स्थावर मालमत्ता बळकाविल्याचे पोलिसांच्या चाैकशीत निष्पन्न होत आहे. म्हैसाळ येथील हॉटेल व्यावसायिक मनीष गायकवाड यांनी हॉटेल व्यवसायासाठी धुमाळ सावकाराकडून सात टक्के व्याज दराने ३३ लाख रुपये कर्ज घेतले होते. सहा महिन्यांचे व्याज व मुद्दल असे एकूण ४९ लाख १७ हजार रुपये देण्यासाठी वारंवार तगादा व धमक्या दिल्या जात होत्या. कर्जवसुलीसाठी जमीन व हॉटेल बळकावण्यासाठी धुमाळ पिता-पुत्राने मनीष गायकवाड यांना घरातून घेऊन जाऊन परस्पर खरेदी दस्त करून घेतला. गायकवाड यांचे चार गुंठे जागेतील हॉटेल व आठ गुंठे खुली जागा अशा १२ गुंठे जमिनीची खरेदी ६३ लाख ३० हजार रुपयांना करण्यात आली. यातील सावकारी कर्जाची बाकी असलेले ४९ लाख १७ हजार रुपये कापून घेऊन उर्वरित १४ लाख ३० हजार रुपये मनीष गायकवाड यांना देणे होते. मात्र, धुमाळ पिता-पुत्रांनी ६३ लाख ३० हजारांची खरेदी दाखवून उर्वरित १४ लाख रुपये, हॉटेल व जमीन बळकावली. व्यवहारातील उर्वरित १४ लाख ३० हजार रुपये परत न देता फसवणूक केल्याची फिर्याद वैभवी गायकवाड यांनी मिरज ग्रामीण पोलिसात दिली आहे. याप्रकरणी सावकार धुमाळ पिता-पुत्रावर दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सावकार धुमाळ पिता-पुत्रांविरुद्ध पोलिसात दुसरा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2021 4:32 AM