लोकमत न्यूज नेटवर्कवारणावती : चांदोली धरण परिसरात मंगळवारी रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसाने सलग दुसºयादिवशी अतिवृष्टीची नोंद झाली.मंगळवारी रात्री धरणाचे चारही वक्राकार दरवाजे दोन मीटरने उचलून दरवाजे व जलविद्युत प्रकल्पातून एकूण २३ हजार ५४८ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग वारणा नदीत सुरू करण्यात आला. बुधवारी सकाळनंतर पावसाने जोर कमी केल्याने दुपारी ४ वाजता दरवाजाची उंची १.२५ मीटरने कमी करून, विसर्ग १२ हजार ४५६ क्युसेकपर्यंत कमी करण्यात आला. दुपारी चारपर्यंत केवळ १० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
आरळा-शित्तूर पूल, चरण-सोंडोली पूल पाण्याखाली गेल्याने पन्हाळा, शाहुवाडी तालुक्यांशी असलेला संपर्क तुटला आहे. परिसरातील नदीकाठची पिके पाण्याखाली गेली आहेत. भात पिकांचे नुकसान झाले आहे. चांदोली धरण परिसरात मंगळवारी ७५ मिलिमीटर पावसाची नोंद वारणावती पर्जन्यमापक यंत्रावर झाली आहे. त्यानंतर बुधवारी सकाळी आठपर्यंत मुसळधार पावसामुळे अतिवृष्टी नोंदली गेली. धरणही शंभर टक्के भरले आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून पडणाºया मुसळधार पावसामुळे चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक २२ हजार क्युसेकपर्यंत वाढली होती. धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मंगळवारी रात्री उशिरा धरणाचे चारही दरवाजे दोन मीटरने उचलण्यात आले.
चारही वक्राकार दरवाजातून २२ हजार क्युसेक व विद्युत निर्मिती केंद्रातून १५४८ क्युसेक, असा एकूण २३५४८ क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू होता. त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. आरळा-शितूर व चरण-सोंडोली हे दोन्ही पूल पाण्याखाली गेले. त्यामुळे शिराळा व शाहुवाडी तालुक्यातील गावांचा संपर्क तुटला. नदीकाठची भात, ऊसपिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग काळजीत आहे. सोनवडे येथील स्मशानशेड व तुकाराम कडवेकर यांच्या घरात पाणी घुसले. काळुंद्रे येथील उबाळे वस्तीमधील घरांमध्येही पाणी शिरले.
दरम्यान, बुधवारी सकाळनंतर पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र होते. सकाळी आठ ते सायंकाळी चारपर्यंत केवळ १० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे दरवाजाची उंची ०.७५ मीटरपर्यंत कमी करून विसर्गही १२ हजार ४५६ क्युसेकपर्यंत कमी करण्यात आला. बुधवारअखेर २१५९ मिलिमीटर पावसाची नोंद वारणावती येथील पर्जन्यमापक केंद्रावर झाली आहे.चरण-सोंडोली पूल पाण्याखालीचरण : शिराळा पश्चिम भागात सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारा चरण येथील चरण-सोंडोली पूल पाण्याखाली गेल्याने शाहुवाडी तालुक्यातील माळेवाडी, थावडे, जांबूर, विरळे, मालगाव, सोंडोली गावांचा संपर्क तुटला आहे. परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून, शालेय मुलांना शाळेत वेळेवर जाता आले नाही. वारणा नदीकाठची पिके पाण्याखाली गेल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. चरण-सोंडोली पूल परिसरात वारणा नदीचे पाणी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.