लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोना लसीच्या पहिल्या डोसनंतर दिलेल्या मुदतीत दुसऱ्या डोससाठी नागरिकांची धावाधाव सुरू आहे. पण लस उपलब्ध नसल्याने ते हवालदिल झाले आहेत. पण दुसऱ्या डोसला विलंब झाला तरी घाबरून जाण्याचे कारण नाही, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
पहिल्या डोसनंतर २ ते ४ आठवड्यांत मानवी शरिरात प्रतिजैविके तयार होतात. लसीकरणानंतर इतरांपासून संसर्गाची शक्यता कमी होते. पहिल्या आठवड्यानंतर कोरोनाविरोधात लढ्यासाठी काही प्रमाणात प्रतिजैविके तयार होतात. दुसऱ्या डोसनंतर त्यांच्या निर्मितीला गती मिळते. पहिला डोस पूरक असतो, तर दुसरा बुस्टर डोस असतो. पण दुसरा डोस मिळाला नाही, तर घाबरून जाण्याचे कारण नाही. पहिल्या डोसनंतर कोरोना संसर्गाचा धोका निम्म्याने कमी होतो. लसीकरणानंतर १४ दिवसांनी कोरोनापासून संरक्षण मिळते. २८ दिवसांनंतर कोरोनाची लक्षणे दिसण्याची शक्यता ६० ते ६५ टक्के कमी होते.
लस घेतल्यानंतर तीन आठवड्यांनी कोरोना संसर्ग झालाच, तर तुमच्यापासून इतरांना संसर्गाचा धोका ५० टक्क्यांपर्यंत कमी होतो. पहिल्या डोसनंतर २ ते ४ आठवड्यात प्रतिजैविके तयार होतात. अशावेळी कोरोना झाला तरी त्याची लक्षणे सौम्य असतात. इतरांना संसर्गाचा धोका कमी होतो. अर्थात पहिला डोस ५० टक्के संरक्षण देतो. तथापि, ४ ते ६ आठवड्यात दुसरा बुस्टर डोस घेणे अपेक्षित असते. कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस तीन महिन्यांपर्यंत घेतला तरी चालतो. कोवॅक्सिन लसीचा दुसरा डोस चार ते सहा आठवड्यांपर्यंत घेतला तरी चालतो, उशीर झाल्याने फार गंभीर धोका नसतो, असा तज्ज्ञांचा दावा आहे. लसीकरणावेळी दुसऱ्या डोससाठी प्राधान्य दिले जाते. लसीचे दोन्ही डोस मात्र एकाच कंपनीचे असले पाहिजेत.
पहिल्या डोसनंतर २१ दिवसांनी संसर्ग झाला तरी मृत्यूची शक्यता कमी असते. तरीही दुसरा डोस आवश्यकच ठरतो.
बॉक्स
लस मिळेपर्यंत थांबावे लागेल
सध्या लसीचा तुटवडा असला तरी, ती आल्यानंतर दुसऱ्या डोसच्या लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तूर्त प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय नाही. सामान्यत: २८ ते ४५ दिवसांदरम्यान दुसरा डोस घ्यावा, असा वैद्यकीय क्षेत्राचा सल्ला आहे. सध्या अनेक लाभार्थ्यांची दुसऱ्या डोसची मुदत सुरू झाली आहे. पोर्टलवर त्यासाठीची नोंदणी होते, पण दुसऱ्या दिवशी नोंदणी रद्द झाल्याचा तसेच नव्याने नोंदणी करण्याचा मेसेज मिळतो. पुरेशी लस मिळेपर्यंत हीच स्थिती राहणार आहे.
कोट
पहिल्या डोसनंतर २८ ते ४५ दिवसांदरम्यान दुसरा डोस घेणे अपेक्षित आहे. पण उशीर झाला म्हणून लाभार्थ्यांनी हवालदिल होण्याचे कारण नाही. पुढे आणखी १० ते १५ दिवस विलंबाने लस घेतली तरी चालू शकते. त्यामुळे पहिल्या डोसची परिणामकारकता कमी होत नाही.
- डॉ. संजय साळुंखे, जिल्हा शल्यचिकित्सक.
पॉईंटर्स
पॉईंटर्स
पहिला डोस झालेले आरोग्यसेवक - २६,१५५
दुसरा डोस झालेले आरोग्यसेवक - १५,०७८
पहिला डोस झालेले फ्रन्टलाईन वर्कर्स - २४,९४७
दुसरा डोस झालेले फ्रन्टलाईन वर्कर्स - ८,२९१
पहिला डोस झालेले ज्येष्ठ नागरिक - २,२८,७८०
दुसरा डोस झालेले ज्येष्ठ नागरिक - २७,९४८
पहिला डोस झालेले ४५ वयापेक्षा जास्त वयाचे - २,१९,५९७
दुसरा डोस झालेले ४५ वयापेक्षा जास्त वयाचे - ११,७५७