सांगली : नोकरी, व्यवसाय, शिक्षणानिमित्त परदेशी जाणाऱ्यांना कोरोनाची लस प्राधान्याने दिली जात आहे. लसीकरण सुरू असलेल्या कोणत्याही केंद्रावर पारपत्र दाखवल्यानंतर लस मिळेल, अशी माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. विवेक पाटील यांनी दिली.
जगभरातील अनेक देशांत परदेशी प्रवाशांना लस घेतली असेल तरच प्रवेश दिला जात आहे. सध्या महाराष्ट्रभरात टंचाई असल्याने लस मिळणे मुश्कील झाले आहे. लाखो नागरिक प्रतीक्षा यादीत आहेत. या स्थितीत परदेशी जाणाऱ्यांची मात्र कोंडी झाली आहे. त्यांच्यासाठी शासनाने विशेष सोय केली आहे. लसीकरणामध्ये त्यांना प्राधान्य दिले जात आहे. सांगली जिल्ह्यात लसीकरण सुरू असणाऱ्या कोणत्याही केंद्रावर पारपत्र दाखवताच लस टोचली जाणार आहे. परदेशात कोव्हॅक्सिनला मान्यता नाही, त्यामुळे कोविशिल्ड लस टोचली जाईल. या लसीचा दुसरा डोस ८४ दिवसांनंतर दिला जातो; पण, परदेशी प्रवाशांसाठी २८ दिवसांतच दिला जाईल. त्यामुळे त्यांना लस घेण्यासाठी आताच नियोजन करावे लागणार आहे.
दरम्यान, गुरुवारी १,८६५ जणांनी लस घेतली. त्यापैकी १,२५९ जणांनी पहिला तर ६०६ जणांनी दुसरा डोस घेतला.
चौकट
पर्यटनासाठी लस नाही
शिक्षण, नोकरी, व्यवसायासाठी परदेशी निघालेल्यांना लस मिळेल, पर्यटनासाठी जाणाऱ्यांना मात्र ही सोय नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. गुरुवारअखेर सुमारे सव्वाशे जणांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे.