प्रताप महाडिककडेगाव : ताकारी योजनेचे यावर्षीचे तिसरे व रब्बी हंगामातील दुसरे आवर्तन सोमवारी रात्री सुरू झाले. या योजनेच्या १८ हजार हेक्टर लाभक्षेत्राला दिलासा मिळाला आहे. आवर्तन सुरू झाल्याने लाभक्षेत्रातील शेतकरीवर्गातून समाधान व्यक्त होत आहे. ताकारी योजनेचे यावर्षीचे पहिले आवर्तन खरीप हंगामात दिले होते.रब्बी हंगामातील पहिले व यावर्षीचे दुसरे आवर्तन ५ नोव्हेंबर रोजी सुरू करण्यात आले होते. ते आवर्तन सुरू झाल्यानंतर अनेक वेळा तांत्रिक बिघाड व अवकाळी पावसामुळे योजना बंद ठेवावी लागली. त्यामुळे ३५ दिवस चालणारे आवर्तन तब्बल ५० दिवस चालवावे लागले. या कालावधीत कृष्णा नदीतून एक पॉइंट एक टीएमसी पाणी उचलण्यात आले. या माध्यमातून ताकारी योजनेच्या सर्व लाभक्षेत्राला पुरेसे पाणी उपलब्ध झाले.
मिरज तालुक्यातील सोनीपर्यंत १४४ किलोमीटरपर्यंतच्या सर्व लाभक्षेत्राला पाणी दिल्यानंतर ते आवर्तन बंद केले होते. ताकारी योजनेच्या वाट्याचे यावर्षीचे ३.६ टीएमसी पाणी उचलणे बाकी आहे. आता चालू आवर्तन ३० ते ३५ दिवस देण्याचे नियोजन आहे, असे ताकारी योजनेचे कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी सांगितले.सक्षमपणे योजना आणि समृद्ध शेतीताकारी उपसा सिंचन सक्षमपणे कार्यरत असून, या योजनेचे आवर्तनही विहीत वेळेत मिळत आहे. योजनेची पाणीपट्टी आकारणी व वसुली नियमितपणे होत आहे. यामुळे वीजबिल थकबाकीचा प्रश्न उद्भवत नाही. योजना सक्षमपणे चालत असल्यामुळे लाभक्षेत्रातील शेती समृद्ध झाली आहे.