इस्लामपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रशासनाने लावलेल्या लॉकडाऊनच्या काळात इस्लामपूर उपविभागातील पोलिसांनी कोविड नियमावलीअंतर्गत कारवाई करत तब्बल २७ लाख रुपयांची भर सरकारी तिजोरीत टाकली. पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी ही माहिती दिली.
पिंगळे म्हणाले, लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना बाहेर न पडण्याविषयी वारंवार आवाहन करण्यात आले होते. मात्र तरीही रस्त्यावर दुचाकी, चारचाकी वाहने घेऊन तसेच मास्कचा वापर न करता फिरणाऱ्यांना कारवाईदरम्यान लक्ष्य करण्यात आले. या कारवाईत उपविभागातील सहा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरत कायद्याचा बडगा दाखविला.
विनामास्क फिरणाऱ्या दोन हजार ५८६ जणांवर कारवाई करत ८ लाख ९६ हजार ९०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच ६१३ वाहने जप्त करण्यात आली असून त्यामध्ये ९ चारचाकी वाहने आहेत.
कोविड नियमावली आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्याचे ३७२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वेळेचे बंधन न पाळता सुरू ठेवण्यात आलेली २२ दुकाने सील करण्यासाठी तहसील कार्यालयास प्रस्ताव दिले होते. पाच हजार ४५४ दुचाकींवर कारवाई करत तब्बल १७ लाख ९६ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या सगळ्या कारवाईतून पोलीस दलाने सरकारी तिजोरीत २६ लाख ९३ हजार ५०० रुपयांची भर घातली आहे.