सांगली : कोरोनाची दुसरी लाट डिसेंबरअखेर अथवा जानेवारीमध्ये येण्याची शक्यता गृहीत धरून यंत्रणेने सज्ज राहावे. गरज पडल्यास कोरोनाची यंत्रणा पुन्हा कार्यान्वित करावी लागेल, हे लक्षात ठेवावे असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले. शासकीय अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर्स, नर्सेस, आशा तसेच अंगणवाडी सेविकांचे पहिल्या टप्प्यात लसीकरण करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. सोशल डिस्टन्सिंग राखून लसीकरणाचा प्रशिक्षण कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याची सूचना केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात लसीकरणाच्या अनुषंगाने जिल्हा समन्वय समितीची बैठक झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, मिरज वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे, महापालिका उपायुक्त स्मृती पाटील, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. मिलिंद पोरे, माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. विवेक पाटील यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
लसीकरणाच्या सज्जतेचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी घेतला. ते म्हणाले, लसीकरण तीन टप्प्यात होईल. पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्य सेवेशी निगडित अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर्स, नर्सेस, आशा, अंगणवाडी सेविकांचे लसीकरण होईल. दुसऱ्या टप्प्यात फ्रन्टलाईन अधिकारी, कर्मचारी, पोलीस व इतर विभागांच्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण होईल. तिसऱ्या टप्प्यात ५० वर्षांवरील व्यक्तींचे व ५० वर्षांखालील व्याधीग्रस्तांचे लसीकरण करण्यात येईल.
ते म्हणाले, पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी संबंधितांची नोंदणी कसोशीने करावी. त्यांची यादी पोर्टलवर तात्काळ भरावी. तालुकास्तरावर टास्क फोर्स स्थापन करावेत. या फोर्सने डाटा कलेक्शनचे काम प्राधान्याने करावे. लाभार्थ्यांच्या नोंदणीची जबाबदारी संबंधित कार्यालय प्रमुखांची राहील. यासाठी को-विन प्रणाली हाताळण्यासाठी चांगले मनुष्यबळ नियुक्त करावे.
चौकट
लसीकरण सत्रांची ठिकाणे, लसटोचक आदी तयारीचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. शीतसाखळी उपकरणे व कोल्ड स्पेसबाबतही सूचना दिल्या. जिल्हास्तरीय लसीकरण कक्ष कार्यान्वित करून सर्व माहिती पोर्टलवर अपलोड करण्यास त्यांनी सांगितले.
----------