सांगली : केंद्र सरकारने दोन वर्षापूर्वी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचे द्वितीय वर्षश्राद्ध कॉँग्रेसने शनिवारी घातले. यावेळी जोरदार निदर्शने करीत शासनाचा निषेध त्यांनी केला. जुन्या नोटांच्या छायाचित्रांना पुष्पहार अर्पण करून कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांनी श्रद्धांजली वाहिली.
येथील कॉँग्रेस भवनासमोर आंदोलन करण्यात आले. यामध्ये कॉँग्रेसचे आ. मोहनराव कदम, जिल्हा प्रभारी प्रकाश सातपुते, सहप्रभारी संजय पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील आदी प्रमुख नेते सहभागी झाले होते. ‘नोटाबंदी का क्या हुआ, हिसाब दो, जवाब दो’, ‘हुकूमशाही प्रवृत्तीचा धिक्कार असो’, असे फलक हाती घेऊन पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात घोषणाबाजी केली. शासनाचा निषेधही व्यक्त केला. यावेळी सहप्रभारी पाटील म्हणाले की, नोटाबंदीच्या काळात देशातील १ कोटी ६८ लाख लोकांचे रोजगार गेले. आणखी बºयाच लोकांचे रोजगार अडचणीत आले आहेत. नरेंद्र मोदींसारखे हे आकडे बोगस नसून, त्याबाबतचे कागदी पुरावे आमच्याकडे आहेत. सरकारने हे उद्योजकांच्या सोयीसाठी गरिबांविरोधात रचलेले मोठे षड्यंत्र होते.
पृथ्वीराज पाटील म्हणाले की, या निर्णयामुळे देशाची व पर्यायाने सर्वसामान्य माणसाची अर्थव्यवस्था ढासळली. नीरव मोदी, विजय मल्ल्या यासारखे अनेक उद्योजक पैसे घेऊन सरकारच्या नाकासमोर देश सोडून पळून गेले. वास्तविक ठराविक उद्योजकांना मदत करण्यासाठीच हा निर्णय घेतला गेला. नोटाबंदीचा निर्णय चुकला, तर मला फाशी द्या, असे वाक्य नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी भाषणात उच्चारले होते.
आता हा निर्णय फसल्याचे समोर आले आहे. मग आता नरेंद्र मोदी काय करणार आहेत. त्यांच्या शब्दाचे पालन की, शब्दापासून फारकत घेणार आहेत, याचे उत्तर त्यांनीच द्यावे, असे पाटील म्हणाले. आंदोलनात नामदेवराव मोहिते, राजन पिराळे, सुवर्णा पाटील, अॅड. भाऊसाहेब पवार, अजित ढोले, सनी धोत्रे, रवींद्र देशमुख आदी पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते....तर त्यांचा अहवाल पाठविणारसांगली जिल्हा कॉँग्रेसच्या माध्यमातून आंदोलने व अनेक कार्यक्रम होत असतात. या कार्यक्रमाला अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते गैरहजर असतात. त्यांच्या गैरहजेरीचा अहवाल प्रदेश कॉँग्रेसकडे पाठविला जाणार आहे. तो अहवाल गोपनीय राहणार असल्याचे जिल्हा कॉँग्रेसचे प्रभारी प्रकाश सातपुते यांनी सांगितले.