साखर कारखान्यातून निर्माण दारूचा महापूर रोखण्याची गरजसांगली : सांगली, कोल्हापूर, नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यातील दारूच्या महापुरामुळे मराठवाडा, विदर्भातील लाखो कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. सांगलीकडून येणारा हा दारूचा महापूर येथील नागरिकांनी थांबवावा. तसेच दारू व तंबाखूमुक्त सांगलीचे स्वप्न पाहा, असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व ‘शोधग्राम’चे संस्थापक डॉ. अभय बंग यांनी मंगळवारी केले. श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील ट्रस्टच्यावतीने देण्यात येणारा ‘नेमगोंडा दादा पाटील जनसेवा पुरस्कार’ अभय बंग यांना रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी डॉ. बंग बोलत होते.ते म्हणाले की, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या जिल्ह्यात दारूबंदीची चळवळ हाती घेतली आहे. २००८ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात गडचिरोलीत ५० टक्के लोक तंबाखूच्या आहारी गेले होते. गेल्यावर्षीच्या सर्व्हेत ५२ कोटींची दारू व दीडशे कोटींची तंबाखू खात असल्याचे आढळून आले. दारू व तंबाखू या दोन व्यसनांकडे दुर्लक्ष करण्यासारखी स्थिती राहिलेली नाही. गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाली असली तरी, त्याला राजकीय नेत्यांनीच विरोध केला होता. वास्तविक दारूची निर्मितीच थांबली तर, अनेक कुटुंबांची पडझड थांबू शकते. सांगली, कोल्हापूर, नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यातून दारूची मोठ्या प्रमाणात निर्मिती होते. हीच दारू मराठवाडा, विदर्भात विक्रीसाठी येते. त्यामुळे लाखो कुटुंबे उद््ध्वस्त होत आहेत. केवळ मराठवाडा, विदर्भच नव्हे, तर सांगली, कोल्हापूर जिल्हाही दारूमध्ये बुडाला आहे. त्यामुळे या परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी साखर कारखान्यांतून निर्माण होणारा दारूचा महापूर रोखला पाहिजे. सुरेश पाटील म्हणाले, २५ वर्षांपासून जनसेवा व विशेष सेवा पुरस्कार देण्यात येतात. गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी चळवळ, स्त्रियांच्या आरोग्याच्या प्रश्नावरील संशोधन, नवजात बालकांच्या मृत्यूच्या कारणांचा अभ्यास व उपाययोजना यासारखे सामाजिक कार्य त्यांनी केले आहे. यावेळी रुग्णांना मदत करणाऱ्या दानोळी (ता. शिरोळ) येथील सुकुमार पाटील यांना विशेष सेवा पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. प्रारंभी राजमती पाटील गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत गायिले. ट्रस्टचे जे. बी. पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी डॉ. अनिल पाटील, सुकुमार पाटील यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमास सुहास पाटील, अशोक पाटील, महावीर आडमुठे, शीतल पाटील, कमल दोडण्णावर, त्रिशला खोत, वर्धमान वीरगौडर, मोहन चौगुले, अशोक सकळे, शांतिनाथ कांते, राजगोंडा पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)
दारू व तंबाखूमुक्त सांगलीचे स्वप्न पाहा...
By admin | Published: February 28, 2017 11:45 PM