सांगली , दि. १३ : शहर असो की गावखेडे, प्रत्येकठिकाणी अनेक परंपरा माणसाला चिकटलेल्या असतात. या परंपरांचा त्याग करणे आणि निसर्गाची कास धरून क्रांतीची बिजे रोवणे तितके सोपे नसते. तरीही कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची या गावी अशी क्रांतीची बीजे दुख:द प्रसंगातच पेरली गेली. कोणतेही कर्मकांड न करता वृक्षारोपण करीत त्याठिकाणी रक्षाविसर्जन करून अंत्येष्ट विधी पार पडला.
मराठा सोशल सोशल ग्रुपचे सभासद असलेले कुची येथील यशवंत शिवाजी पाटील यांच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले. यशवंत पाटील यांच्यावर सोशल ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक व निसर्गपुरक संस्कार होतेच. त्यांनी प्रत्यक्षात या संस्कारांना आपल्या माती रुजविण्याचा निर्णय वडिलांच्या निधनानंतर घेतला. निसर्गाशी नाते सांगणाºया परंपरेची सुरुवात त्यांनी आपल्या घरापासून केली.
वडिलांच्या निधनाने घरावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. या प्रसंगातही यशवंत यांनी कुटुंबियांशी संवाद साधून वडिलांचा अंतेष्ट विधी निसर्गपूरक करण्याविषयी चर्चा केली. यशवंत यांचे बंधू दिलीप पाटील व मातोश्री कमल पाटील यांच्यासह कुटुंबानेही त्यांना साथ दिली आणि समाजाला एक नवी दिशा देणारी घटना कुची या गावात घडली.
वडिलांच्या नावे त्यांनी वृक्षारोपण केले आणि त्यांची रक्षा त्या वृक्षाच्या मुळाशी विसर्जित केली. त्यांच्या मातोश्री कमल पाटील यांचे सौभाग्य अलंकारसुद्धा काढले नाहीत. तसेच केस अर्पण, दहावा, बारावा, तेरावा असे कोणतेही विधी त्यांनी केले नाहीत. कर्मकांडाचे मुळापासून उच्चाटन करीत त्यांनी नवा संदेश या माध्यमातून दिला. मराठा सोशल ग्रुपचे कुटुंब प्रमुख ए. डी. पाटील, सदस्य आर. एस. पवार यांनी यासाठी पुढाकार घेतला.
मराठा समाजाचे ए. डी. पाटील यावेळी म्हणाले की, मराठा समाजात अंत्यविधीचे कर्मकांड अत्यंत कर्मठ पद्धतीने करण्याची परंपरा आहे. यामध्ये बदल व्हावा, असे समाजाला वाटते, पण पुढाकार घ्यायचा कुणी, यातच सर्व काही अडते. कर्मकांडात अडकलेला मराठा समाज हळुहळु जागृत होऊन पुरोगामी विचाराची कास धरू लागला आहे. अंतेष्ट विधी या कायमच्या बंद झाल्या पाहिजेत. कर्मातच देव आहे. पोथ्या पुराणांपेक्षा विज्ञानाची पुस्तके हाती घेतली पाहिजेत. निसर्ग, विज्ञान आणि माणसात देव आहे, ही गोष्ट ओळखता आली पाहिजे. यावेळी ग्रामस्त शंकर पाटील, शामजी काका, एन. के. पाटील, रामचंद्र पाटील, सुखदेव पाटील उपस्थित होते.
तिसरी घटनाकर्मकांड बंद करून निसर्गपूरक अंत्यविधी करण्याची सांगली जिल्ह्यातील ही तिसरी घटना आहे. यापूर्वी सांगली, आष्टा येथे अशाचप्रकारे अंत्यविधी करण्यात आला होता. आता कुची येथेही याचपद्धतीने कर्मकांडास फाटा देण्यात आला. ए. डी. पाटील यांनी या गोष्टीचा वसा घेतला आहे.
या तिन्ही घटनांवेळी त्यांनी संबंधित कुटुंबांशी अनेक तास चर्चा करून त्यांचे प्रबोधन केले होते. त्यांच्या या कार्यास आता यश येताना दिसत आहे. कर्मकांडाचा वाचलेला पैसाही ते एखाद्या शाळेला दान देण्यासाठी करा, असा संदेश देत आहेत.