सांगली : खासगी सावकारीच्या वसुलीसाठी जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संजय उत्तम तावदारकर याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी मंगळवारी त्याच्या घराची झडती घेतली. यात अनेक महत्त्वाची कागदपत्रे हाती लागल्याची माहिती शहरचे निरीक्षक अजय सिंदकर यांनी दिली.
सांगलीवाडीतील व्यापारी सुहास प्रकाश मोहिते यांच्या फिर्यादीनंतर शहर पोलिसांनी खणभागातील भांडवले गल्लीत राहणाऱ्या खासगी सावकार संजय तावदारकर याला सोमवारी अटक केली. त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिल्यानंतर पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली. त्या वेळी फिर्यादी मोहिते यांची शाहुवाडी तालुक्यातील केरले गावातील जमीन खरेदीची कागदपत्रे सापडली आहेत. सावकाराने मोहिते यांना धमकावून ती जमीन आपल्या नावावर करून घेतली आहे. परंतु त्याने संबंधित जमीन रोखीने खरेदी केल्याची कागदपत्रे तयार केली होती. याबाबत मोहिते यांनी फिर्यादीत उल्लेख केला आहे.
दरम्यान, सावकार तावदारकर याचा राहुलदादा नामक साथीदार अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. तो कराड येथील एका रुग्णालयात वॉर्डबॉय म्हणून काम करीत असल्याचे उघडकीस आले आहे. तो फोनच्या माध्यमातून मोहिते यांना वसुलीबाबत धमकावत होता, अशी माहिती चौकशीत समोर आली आहे. त्याला लवकरच अटक केले जाईल, असेही सिंदकर यांनी सांगितले.