फोटो २१ महापालिका
मिरजेत रस्त्याकडेला महिनो न महिने वाहतुकीला अडथळा करीत पडलेली वाहने महापालिकेने उचलली.
- कौसेन मुल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिकेच्यावतीने सुरू असलेल्या बेवारस वाहनावरील कारवाईत आतापर्यंत ६० वाहने जप्त करण्यात आली आहेत. सोमवारी आयुक्त नितीन कापडणीस यांनी जप्त केलेल्या वाहनांची व मोहिमेची पाहणी केली. नागरिकांनी आपल्या परिसरातील बेवारस वाहनांची छायाचित्रे महापालिकेला पाठवावीत, ती जप्त केली जातील, असे आवाहन कापडणीस यांनी केले आहे.
महापालिका क्षेत्रात रस्त्यांवर महिनो न महिने पडून असणाऱ्या वाहनांवर जप्तीची कारवाई महापालिकेने सुरू केली आहे. आयुक्त कापडणीस यांच्या आदेशाने शनिवारपासून मोहीम जोरदारपणे राबविली जात आहे. सांगलीत सहायक आयुक्त सहदेव कावडे, एस. एस. खरात आणि अतिक्रमण निर्मूलन अधिकारी दिलीप घोरपडे यांचे पथक मोहीम राबवीत आहे. मिरजेत सहायक आयुक्त दत्तात्रय गायकवाड यांच्या पथकाकडून वाहने जप्त केली जात आहेत. तीन दिवसांत सुमारे ६० छोटी-मोठी वाहने जप्त करण्यात आली. आज, मंगळवारपासून मोहीम तीव्र केली जाणार असल्याचे संकेत अधिकाऱ्यांनी दिले. आयुक्त कापडणीस यांनी मोहिमेची पाहणी करून सूचना दिल्या. ते म्हणाले की, शहराचे विद्रुपीकरण करणारे एकही वाहन रस्त्यावर ठेवू दिले जाणार नाही. त्यांच्यामुळे वाहतुकीलाही अडथळे होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आल्या होत्या. सध्या प्रशासनाला आढळणारी अशी वाहने जप्त केली जात आहेत. या मोहिमेत नागरिकांनीही सक्रिय सहभाग घ्यावा. आपल्या भागात पडून असणाऱ्या अशा वाहनांची छायाचित्रे व्हॉटसॲपद्वारे सहायक आयुक्तांच्या मोबाईलवर पाठवावीत. रस्त्यावर लावलेली वाहने स्वत:च्या जागेवर लावावीत, अन्यथा महापालिकेकडून जप्त केली जातील.
चौकट
मिरजेत समस्या गंभीर
रस्त्याकडेला बेवारस स्थितीत महिनोनमहिने पडून असन्ऱ्या वाहनांची समस्या मिरजेत गंभीर आहे. हिरा हॉटेल चौक ते शहर पोलीस ठाणे या रस्त्यावर दुतर्फा वाहने, मंडपाचे साहित्य नेणाऱ्या गाड्या, रिक्षा, हातगाडे लावलेले असतात. शास्त्री चौकातही अशीच स्थिती आहे.
------------
---------------