सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सांगली लोकसभेची जागा मिळण्याची शक्यता बळावली असतानाच, सक्षम उमेदवारांची चाचपणीही संघटनेने सुरू केली आहे. माजी मंत्री अजितराव घोरपडे, जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष व जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक असलेले दिलीपतात्या पाटील यांचाही उमेदवारीसाठी विचार सुरू झाला आहे.कॉँग्रेस-राष्टÑवादी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आघाडीतील जागावाटप आता अंतिम टप्प्यात आले असून, सांगली लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्याबाबत हालचाली गतिमान झाल्या आहेत. संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनीही सक्षम उमेदवाराबद्दल चाचपणी सुरू केली आहे. त्यांची पहिली पसंती इंद्रजित देशमुख यांना होती, मात्र ते फारसे उत्सुक नसल्याने पर्याय म्हणून माजी मंत्री व भाजपवर नाराज अजितराव घोरपडे यांच्या नावाचाही विचार सुरू झाला आहे. अजितराव घोरपडे यांनी २००९ मध्ये कॉँग्रेसचे माजी मंत्री प्रतीक पाटील यांना लोकसभा निवडणुकीत टक्कर दिली होती. केवळ ३९ हजाराच्या मतांचा फरक त्यांच्यात होता. त्यामुळे सक्षम उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची चाचपणी सुरू आहे. दुसरीकडे जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांच्याही नावाचा विचार सुरू आहे. जयंत पाटील यांचे ते कट्टर समर्थक असले तरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी त्यांचे संबंध चांगले राहिले आहेत. ऊसदराची कोंडी फोडण्यासाठी त्यांनी मध्यस्थीही केली होती. त्यामुळे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना त्यांच्याबद्दल तक्रार नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्यांनासुद्धा विचारात घेतले जाण्याची शक्यता आहे.चर्चा करून निर्णय घेऊ!दिलीपतात्या पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढण्यास मला काही अडचण नाही, मात्र याचा निर्णय जयंत पाटील यांच्याशी चर्चा करून घेण्यात येईल. अद्याप ही जागा कोणाच्या वाट्याला येणार याबाबत अनिश्चितता आहे.यापूर्वी मी राष्टÑवादीतर्फे इच्छुक असल्याचे सांगितले होते, मात्र ही जागा राष्टÑवादीला मिळणार नाही. आता स्वाभिमानीला ती मिळण्याची शक्यता असताना, त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी माझ्याबद्दल चर्चा केली असली तरी याबाबतचा निर्णय सर्वस्वी जयंत पाटील यांच्यावर अवलंबून आहे.
‘स्वाभिमानी’कडून पर्यायांचा शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 12:01 AM