लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : नवभारत शिक्षण मंडळ संचलित शांतिनिकेतन कन्या शाळेची विद्यार्थिनी भाग्यश्री रवींद्र पाटील हिची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय कला उत्सवासाठी निवड झाली.
शांतिनिकेतन लोकविद्यापीठामधील लोककलाकारांनी महाराष्ट्रात आपल्या कलेचा झेंडा फडकवत ठेवला आहेच; पण आता मातीकाम या पारंपरिक कलेमध्येही शांतिनिकेतनने दिल्लीपर्यंत म्हणजे राष्ट्रीय कला उत्सवापर्यंत झेप मारली आहे. पुणे येथे आयोजित उत्सवामध्ये भाग्यश्री हिने पारंपरिक खेळणी बनविणे या गटात भातुकलीची खेळणी बनवली होती. या तिच्या कलेला राज्यात प्रथम क्रमांक मिळाला. यानंतर दिल्ली ११ ते २० जानेवारी दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली. तिला मुख्याध्यापिका समिता पाटील यांच्यासह शिवदास उमळकर, जीवन कदम, रवींद्र पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले. संचालक गौतम पाटील यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.