लोकमत न्यूज नेटवर्क
बुधगाव : जागतिक कुमारी कुस्ती स्पर्धेसाठी निवडण्यात येणाऱ्या भारतीय संघ निवड चाचणी स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून पदक विजेत्या चार कुस्तीपटूंची निवड झाली आहे. यात सांगली जिल्ह्यातील तुंग (ता. मिरज) येथील संजना खंडू बागडी, कोल्हापूरच्या विश्रांती भगवान पाटील (आमशी, ता. करवीर), सृष्टी भोसले (बिद्री, ता. कागल) आणि ठाण्याची गौरी जाधव (जुगाड फाटा, ता. भिवंडी) यांचा समावेश आहे.
भारतीय कुस्ती महासंघाने आयोजित केलेल्या भारतीय संघ निवड चाचणी स्पर्धा ५ जुलैपासून दिल्लीत सुरू होणार आहेत.
मागील मार्चमध्ये बेल्लारीत (कर्नाटक) राष्ट्रीय ज्युनिअर स्पर्धा झाल्या होत्या. त्यामध्ये या चौघींनी चमकदार कामगिरी करीत पदकांची कमाई केली होती. भारतीय कुस्ती महासंघाने त्यांच्या कामगिरीची दखल घेत, चौघींना भारतीय संघ निवड चाचणी स्पर्धेसाठी निमंत्रित केले आहे. १६ ते २२ ऑगस्टदरम्यान रशियात जागतिक कुस्ती स्पर्धा होत आहेत. संजना बागडी कवलापूर (ता. मिरज) येथील आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्रात प्रशिक्षक उत्तमराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.