इस्लामपूर : केंद्र शासनाने मान्यता दिलेल्या कोव्हॅक्सिन या भारतीय संशोधनाच्या कोरोना प्रतिबंधित लसीच्या चाचणीसाठी येथील प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरची निवड केल्याची माहिती मेडिकल डायरेक्टर डॉ. विजय पाटील यांनी दिली. जिल्ह्यात निवड झालेले हे एकमेव वैद्यकीय महाविद्यालय आहे. त्यामुळे शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. रविवारी या लसीकरणाचा प्रारंभ करण्यात येणार आहे.
डॉ. पाटील म्हणाले, देशभरातून २६ हॉस्पिटल आणि महाविद्यालयांची निवड करण्यात आली आहे. भारत बायोटेक या हैदराबाद येथील कंपनीने ही लस तयार केली आहे. आयसीएमआर दिल्ली आणि एनआयबी पुणे या दोन आंतरराष्ट्रीय संस्थांच्या मार्गदर्शनाखाली ही लस तयार करण्यात आली आहे. ही लस तीन टप्प्यांत दिली जाणार आहे. त्यातील दोन टप्पे पूर्ण झाले असून, त्याचे परिणाम चांगले आले आहेत. ११ नोव्हेंबरपासून तिसऱ्या टप्प्यात २५ हजार ८०० व्यक्तींना ही लस दिली जाईल. ते म्हणाले, प्रकाश हॉस्पिटलमध्ये रविवारी सकाळी ११ वाजता माजी आमदार शिवाजीराव नाईक यांच्या उपस्थितीत एक माजी सैनिक ही लस टोचून घेत या लसीकरणाचा प्रारंभ करतील. हॉस्पिटलला एक हजार डोस मिळाले आहेत. ती सर्वांना मोफत टोचली जाणार आहे. ही लस सुरक्षित, परिणामकारक आणि कोरोनाच्या प्रतिबंधासाठी सिद्ध झाली आहे. कोरोना विषाणूचा नायनाट करून शरीरात प्रतिजैविके निर्माण करण्याची क्षमता चांगली आहे. लसीकरणाच्या केंद्रीय स्तरावरील सर्व शासकीय परवानग्या घेण्यात आल्या आहेत. उद्यापासून सात दिवसांत हे लसीकरण केले जाणार आहे. यावेळी संस्थापक, नगराध्यक्ष निशिकांत पाटील, डॉ. अभिमन्यू पाटील, धैर्यशील मोरे, संदीप सावंत, चंद्रकांत पाटील, भास्कर पाटील उपस्थित होते.