सांगली : शेतकऱ्यांना पपईची खराब रोपे देऊन फसवणूक करणाऱ्या कंपनीविरोधात कारवाई व्हावी व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अन्यथा मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
यासाठी शुक्रवारी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील पाण्याच्या टाकीवरून उडी घेऊन आत्महत्येचा इशारा दिला होता. त्यामुळे कार्यालय परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.दरम्यान, प्रभारी जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. पुणे येथील एका कंपनीने पलूस, खानापूर व कडेगाव तालुक्यातील २२ शेतकऱ्यांना खराब पपईची रोपे दिल्याचा व त्यामुळे शेतकऱ्यांचे ३ कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.
या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी इंटरनॅशनल ह्युमन राईटस् जस्टीस असोसिएशनचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा व त्यापासून अडविल्यास कार्यालयाशेजारी असणाऱ्या पाण्याच्या टाकीवरून उड्या घेऊन आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता.
त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच अग्निशमन दलाचे वाहन व जवानही हजर होते. पाण्याच्या टाकीजवळही बंदोबस्त ठेवण्यात आला होता.दरम्यान, जाधव व उपस्थित शेतकऱ्यांशी प्रभारी जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी संवाद साधला. मात्र, येत्या दहा दिवसात न्याय न मिळाल्यास १५ मे रोजी मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा यावेळी जाधव यांच्यासह शेतकऱ्यांनी दिला.तीन कोटीचा फटकाशेतकऱ्यांनी सांगितले की, पुण्यातील कंपनीने २२ शेतकऱ्यांना ४८ हजार पपईची रोपे दिली होती. ही रोपे खराब असल्याने त्याला फळच आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे ३ कोटींचे नुकसान झाले आहे. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही लक्ष दिले जात नसल्यानेच आंदोलन करण्याची वेळ आली आहे.पोलीस, प्रशासनाची सतर्कताआंदोलनाची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांचे पथक जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. पाठोपाठ अग्नीशमन दलाची यंत्रणाही पोहोचली. प्रशासनानेही आंदोलकांच्या मागणीस सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आंदोलकांनी सामंजस्याची भूमिका घेत आंदोलन थांबविले.