सांगली , दि. १७ : नोटाबंदी, जीएसटी यांच्या प्रतिकूल परिणामांची झळ विक्रेत्यांना बसत असतानाच, ऐन दिवाळीच्या तोंडावर पावसानेही बाजारपेठांना झोडपल्याने दुकानदारांपासून रस्त्यांवरील छोट्या विक्रेत्यांपर्यंत सर्वांनाच दिवाळे अनुभवावे लागले. रांगोळी, मातीच्या पणत्या, पूजेचे साहित्य, किल्ल्यावरील मातीची खेळणी असे साहित्य भिजून विक्रेत्यांना घाट्याचा सौदाही पचवावा लागला.
डोळ्यात अश्रू घेऊनच सध्या विक्रेते नाईलाजास्तव व्यापार करताना दिसत आहेत. बाजारातील गर्दीला कधीच आहोटी लागली होती, त्यात पुन्हा पावसाने उरलीसुरली गर्दीही धुऊन काढली. त्यामुळे विक्रीवर मोठा परिणाम झाला. तसेच मुसळधार पावसाने साहित्य भिजून मोठ्या नुकसानीचा धक्काही विक्रेत्यांना सहन करावा लागला.
बाजारात सध्या उत्साहाच्या वातावरणाची जागा निरुत्साहाने घेतल्याचे दिसत आहे. गेल्या तीन दिवसांपासून दररोज सायंकाळी बाजारातील गर्दीच्या वेळेतच पाऊस हजेरी लावत आहे. शनिवारी आणि रविवारी पावसाने शहराला झोडपून काढले. सांगलीच्या मारुती रोड, कापड पेठ, हरभट रोड, बालाजी चौक परिसरात पावसाचे पाणी तब्बल तीन ते चार तास साचून होते. त्यामुळे ग्राहकांनी बाजाराकडे पाठ फिरविली.
चिखलमय आणि जलमय झालेल्या बाजारपेठांना आता दिवाळीऐवजी दिवाळे अनुभवावे लागत आहे. गेल्या काही वर्षातील हा सर्वात वाईट अनुभव असल्याचे येथील विक्रेत्यांनी सांगितले. दिवाळीपूर्वी दोन दिवस बाजारपेठांमध्ये पाय ठेवायलाही जागा मिळत नव्हती. पण यंदा मात्र बाजारपेठांमध्ये रस्ते, दुकाने आणि विके्रत्यांचे हातगाडे ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत.
पोती भरून साहित्य कोंडाळ्यातबाजारातील रांगोळी विक्रेत्या महिलांनी सांगितले की, रांगोळी आणि पणत्या भिजल्याने प्रत्येक विक्रेत्या महिलेचे सुमारे २ हजाराचे नुकसान झाले. केवळ मारुती रोडवरच जवळपास ४0 वर रांगोळी विक्रेते आहेत. मातीच्या पणत्याही भिजून त्यांचा लगदा तयार झाला होता. मातीची खेळणीही भिजल्याने नुकसानीत मोठी भर पडली.
नोटाबंदी, जीएसटीने अगोदरच व्यापारावर परिणाम दिसत होता. पन्नास टक्क्यांहून अधिक उलाढाल घटली होती. त्यात पावसाने तर कहरच केला आणि होत्या नव्हत्या त्या आशाही मावळल्या.- संजय मुळे,मातीच्या खेळण्यांचे विक्रेते, सांगलीपावसाने पोतेभर रांगोळी भिजली. पणत्याही भिजून मोठे नुकसान झाले. अगोदरच व्यापार कमी होता, त्यात आता निसर्गानेही आम्हाला सोडले नाही. पदरात नुकसानीशिवाय काहीही आले नाही. डोळ्याआड पाणी लपवून ग्राहकांसमोर हसत व्यवसाय करण्याशिवाय आमच्यासमोर काहीही उरलेले नाही.- रेखा वेदू,रांगोळी विक्रेत्या