अविनाश कोळी ।सांगली : पूरस्थितीत अतिरिक्त पाणी पोटात घेऊन संकटाची तीव्रता कमी करणारे नाले, ओत आता बिल्डर, व्यावसायिकांनी गिळंकृत करण्याचा सपाटा लावला आहे. बायपास रस्त्याच्या दुतर्फा असलेले व जुना बुधगाव रस्त्यावरील सर्व नाले, ओत आता विकले गेले असून, नदीचे पात्रच शिल्लक राहिले आहे. भविष्यात ब्ल्यू झोन, रेड झोन शिल्लक राहणार नाहीत, अशीच स्थिती आहे.
जिल्हा प्रशासनाच्या मालकीचे हे नाले, ओत असताना त्यांनी याकडे लक्ष दिले नाही. महापालिकेने सर्रास बांधकाम परवाने देऊन बेकायदेशीर कामांना पाठबळ दिले. राजकीय नेते, कार्यकर्ते, बिल्डर व अन्य छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी नाले, ओत यावर भराव टाकून बस्तान बसविले आहे. घरे, गॅरेज, दुकाने, हॉटेल्स यांची गर्दी या ओतात, नाल्यात दिसत आहे. ओत व नाल्यांवरील अतिक्रमणामुळे भविष्यात पुराचे अतिरिक्त पाणी गावठाणात शिरणार आहे. ज्यांनी निवासी क्षेत्रात नियमानुसार घरे बांधली त्यांना नियमबाह्य बांधकामे करणाऱ्यांमुळे दणका बसणार आहे.
पाटबंधारे विभागाने ४३.३ ही पूरपातळी गृहीत धरून पूररेषा तयार केली होती. या पूररेषेतच आता हजारो बांधकामे उभी राहिली आहेत. मोठमोठे कॉम्प्लेक्स, चित्रपटगृहेसुद्धा या पूररेषेतच येतात. आयुक्तांचे निवासस्थानही याच पूररेषेत येते.
२00५ आणि २00६ या वर्षात आलेल्या महापुराने सांगलीतील अतिक्रमणांना मोठा झटका दिला. त्यानंतर तत्कालीन आयुक्त मिलिंद म्हैसकर यांनी तत्कालीन शहर अभियंता व्ही. एन. अष्टपुत्रे यांच्या अध्यक्षतेखाली नदी, नाले व ओत यांच्या क्षेत्रातील अतिक्रमणांचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमली. या समितीने सादर केलेल्या अहवालानुसार त्यावेळी अडीच हजारावर बांधकामे या पूररेषेत होती. आता ही संख्या सुमारे पंधरा हजाराच्या घरात गेली आहे. पूरपट्ट्यात दिलेले परवाने रद्द करणे व नव्याने कोणतेही परवाने दिले जाऊ नयेत, अशाप्रकारच्या शिफारशी समितीने केल्या होत्या. त्यानुसार महासभेत तसा निर्णय घेतला गेला. नाल्यांचा बफर झोनही निश्चित केला गेला. हे निर्णय, झोनचे नियम गुंडाळून वेगाने नाले, ओत गिळंकृत करण्याची मोहीम सुरू झाली आहे. येत्या वर्षभरात एकही ओत सांगलीत दिसणार नाही, अशी स्थिती आहे.का मिळताहेत परवानग्या....महापालिका आयुक्तांचेच घर पूररेषेत उभारले गेल्याने अन्य बांधकामांना परवानग्या नाकारण्याचा नैतिक अधिकारच महापालिकेने गमावला आहे. त्यामुळे सर्रास या गोष्टीची ढाल बनवून परवानग्या घेतल्या जात आहेत. भविष्यात नदीपात्रालगतही अशाच प्रकारची बांधकामे उभारली गेल्यास आश्चर्य वाटणार नाही. दोष बांधकाम करणाऱ्यांपेक्षा त्यांना परवानग्या देणाºयांचाच अधिक आहे.
संपूर्ण सांगली शहर वेठीससांगली शहरातील गणपती पेठ, टिंबर एरिया, स्टेशन रोड, कापडपेठ, हरभट रोड, मारुती रोड अशा गावठाणात व मुख्य बाजारपेठांमध्ये भविष्यात या ओतातील अतिक्रमणांमुळे दणका बसणार आहे. नागरिकांना वेठीस धरण्याचे काम यामुळे होणार आहे. त्याची तयारी आता झाली असून, पूरस्थिती उद्भवल्यानंतर याचे प्रत्यक्ष परिणाम दिसून येतील.