तासगाव : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सचिन वाझे याच्या माध्यमातून, माजी मृहमंत्री अनिल देशमुख यांनी संजीव पलांडे यांच्या, तर परिवहन मंत्री अनिल परब यांनी बजरंग खरमाटे या अधिकाऱ्याच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची बेनामी संपत्ती गोळा केली आहे, असा आरोप भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी येथे केला.
सोमवारी वंजारवाडी (ता. तासगाव) येथे पहिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या फार्म हाऊसची पाहणी करण्यासाठी किरीट सोमय्या भाजपचे नेते मकरंद देशपाडे यांच्यासमवेत आले हाेते. सकाळी साडेदहा वाजता त्यांनी वंजारवाडीस भेट दिली.परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांना इडीने समन्स बजावून चौकशीसाठी बाेलावले आहे. याबाबत सोमय्या म्हणाले, माझ्या माहितीप्रमाणे इडीच्या अधिकाऱ्यांकडे खरमाटे यांच्या ७५० कोटी रुपयांच्या बेनामी मालमत्तेची माहिती आहे. त्याचीच चौकशी सुरु झाली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांचेही काऊंटडाऊन सुरु झालेले आहे.
किरीट सोमय्या म्हणाले, सांगली जिल्ह्यात चार ठिकाणी परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांची बेनामी मालमत्ता आहे. एका ठिकाणी १५० एकर जमीन आहे. तर औद्योगिक वसाहतीमध्ये पाच एकर जागेवर एक कंपनी आहे. वंजारवाडी गावात अलिशान फार्म हाऊस आहे. या कोट्यवधी रुपयांच्या बेनामी संपत्तीची पाहणी करण्यासाठी आलो आहे.वंजारवाडी येथील फार्म हाऊसची किंमत २० ते २२ कोटी रुपये आहे. परिवहन अधिकारी असे आलिशान फार्म हाऊस कसे बांधू शकतो. बेनामी फार्म हाऊस खरमाटे यांचेच आहे की परिवहन मंत्री अनिल परब यांचे आहे. हे पाहण्यासाठीच आलो आहे.
दोन अनिल जेलमध्ये जाणार
बजरंग खरमाटे हे परिवहन मंत्री अनिल परब यांचे सचिव आहेत. त्यांची बेनामी संपत्ती ही परिवहनमंत्री अनिल परबांची बेनामी संपत्ती असण्याचा दाट संशय आहे. याची चौकशी व्हावी अशी मागणी ईडी, सीबीआय आणि लाचलुचपत विभागाकडे करणार आहे. ठाकरे सरकारचा एक अनिल (माजी गृहमंत्री अनिल देशमुख) जेलच्या दरवाजात उभा आहे, तर दुसरा अनिल (परिवहन मंत्री अनिल परब) जेलमध्ये जाण्याचा मुहूर्त शोधत आहे. हे दोन्ही अनिल लवकरच जेलमध्ये जाणार असल्याचे सोमय्या म्हणाले.