सांगलीतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंदराव मोहिते यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 02:02 PM2024-08-21T14:02:30+5:302024-08-21T14:03:01+5:30
सांगली : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी सरचिटणीस, सांगली जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, तासगाव तालुका काँग्रेस कमिटीचे ...
सांगली : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी सरचिटणीस, सांगली जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, तासगाव तालुका काँग्रेस कमिटीचे पहिले अध्यक्ष, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आनंदराव (भाऊ) ज्ञानदेव मोहिते (वय ९४) यांचे मंगळवारी निधन झाले. भिलवडी (ता. पलूस) येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जिल्ह्यातील काँग्रेस नेते, पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तसेच तासगाव तालुका काँग्रेस कमिटीचे पहिले अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले.
मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर १९६१ मध्ये ते वडगणे (कोल्हापूर) हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून रूजू झाले. १९६२ मध्ये तासगाव तालुका काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीसपदी त्यांची निवड झाली. १९६७ ते १९६९ पर्यंत ते तासगाव तालुका पंचायत समितीचे उपसभापती १९६९ ते १९८२ पर्यंत सभापती राहिले. १९८२ ते १९९० पर्यंत ते जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राहिले. २००१ मध्ये त्यांना राज्य सरकारतर्फे दलितमित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याचवर्षी त्यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या चिटणीसपदी निवड झाली. २००१ ते २००४ या कालावधीत ते महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे संचालक राहिले.
काँग्रेस पक्ष तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी दिवंगत नेते डॉ. पतंगराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिते यांनी परिश्रम घेतले. १९९० ते २००० या काळात जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी काँग्रेस पक्षाची मजबूत बांधणी केली. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते भारती विद्यापीठाचे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र मोहिते, ॲड. रमेश मोहिते यांचे वडील, तर माजी जिल्हा सरकारी वकील वसंतराव मोहिते यांचे बंधू होत.
सांगलीत मंगळवारी काँग्रेस भवनासमोर अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीकडून पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली. काँग्रेस सेवा दलाने सलामी दिली. यावेळी विजया पृथ्वीराज पाटील, विश्वासबापू पाटील, किशोर शहा, मुन्ना कुरणे, करीम मेस्त्री, बिपीन कदम, सनी धोतरे, श्रीकांत जाधव, संजय मेंढे, सी. आर. सांगलीकर, डॉ. शिकंदर जमादार, प्रकाश मुळके, सचिन चव्हाण, अजित ढोले, मौलाली वंटमुरे, अजय देशमुख आदी उपस्थित हाेते.