मिरज : मिरजेतील ज्येष्ठ शस्त्रक्रियातज्ज्ञ ‘मिरज भूषण’ डॉ. बिंदुमाधव दत्तात्रय पुजारी (वय ८९) यांचे दि. ५ रोजी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले.ते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील उत्तम शल्यविशारद म्हणून प्रसिद्ध होते. सुमारे ६० वर्षे त्यांनी वैद्यकीय व्यवसाय केला. संपूर्ण देशातून रुग्ण त्यांच्याकडे उपचाराला येत असत. त्यांचे स्वयंसंशोधित मूळव्याधीवरील उपचार ५९ वर्षे प्रसिद्ध होते. त्यांच्या पश्चात तीन भाऊ आहेत.डॉ. पुजारी यांचा जन्म २४ एप्रिल १९३५ रोजी नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथे झाला. नृसिंहवाडी व कुरुंदवाड येथे त्यांचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण झाले. त्यांनी पुणे विद्यापीठातून एमबीबीएस व जनरल सर्जरीमध्ये एम. एस. केले.डेक्कन सर्जिकल सोसायटीचे महासचिव म्हणून त्यांनी पंचवीस वर्षे काम केले. महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सर्जन्स या संघटनेचे ते बारा वर्षे राज्य सचिव होते. १९९५ मध्ये त्यांना असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडिया या २८ हजार सर्जन्स सदस्य असलेल्या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचा बहुमान मिळाला होता. त्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये चाळीस लेख प्रसिद्ध झाले आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिसंवादात त्यांनी शंभरपेक्षा जादा संशोधन पेपर सादर केले होते. तीन पाठ्यपुस्तकांसह इतर पुस्तकात त्यांचे दहा लेख प्रकाशित झाले आहेत. इंटेस्टीनल ट्यूबर्क्युलोसिसच्या शस्त्रक्रियेची सुधारित पद्धती त्यांनी सुरू केली होती. रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स, एडिनबर्गची फेलोशिप त्यांना मिळाली होती. शिवाजी विद्यापीठाच्या बोर्ड ऑफ स्टडीचे ते सदस्य होते. रोटरी क्लब, रेड क्रॉस सोसायटी, इंडियन कॅन्सर सोसायटी, इंडियन मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी म्हणून त्यांनी काम केले होते. मिरजेतील कृष्णाघाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सांगली - मिरजेतील वैद्यकतज्ज्ञांसह राजकीय, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
मिरजेतील ज्येष्ठ शस्त्रक्रियातज्ञ बी. डी. पुजारी यांचे निधन
By श्रीनिवास नागे | Published: July 05, 2023 4:29 PM