सांगली : राज्यातील प्रत्येक तालुक्यात मुलींसाठी स्वतंत्र आयटीआय प्रस्तावित असल्याची माहिती पालकमंत्री तथा कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी दिली. कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागातर्फे सांगलीत आयोजित छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती शिबिराच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ उपस्थित होते. खाडे म्हणाले, ग्रामीण भागातील युवकांनी शिक्षण घेऊन यशस्वी उद्योजक बनण्याचा प्रयत्न करावा. मुलींनाही उद्योगक्षेत्रात प्रोत्साहित करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र आयटीआय प्रस्तावित आहे. यावेळी खाडे व गाडगीळ यांनी प्रशिक्षणार्थ्यांनी आयोजित केलेल्या तंत्रप्रदर्शनाची पाहणी केली. मेळाव्यात इस्लामपूर येथील हर्षल पाटील, सांगलीतील प्रा. संदीप पाटील, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या समन्वयक निशा पाटील, कौशल्य विकास समन्वयक ऋषिकेश जाधव, प्रवीण बनकर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष गवळी आदी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य व्ही. बी. देशपांडे यांनी प्रस्ताविक केले. उपप्राचार्य एम. एस. गुरव यांनी आभार मानले.कार्यक्रमाला जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त ज. बा. करीम उपस्थित होते. संयोजन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील गट निदेशक एस. के. गोसावी, जी. एम. दंडगे, ए. एस. धानोरकर, यु. व्ही. लोहार आदींनी केले.
राज्यातील प्रत्येक तालुक्यात मुलींसाठी स्वतंत्र आयटीआय, कामगार मंत्री सुरेश खाडेंनी दिली माहिती
By संतोष भिसे | Published: May 06, 2023 5:34 PM