लोकमत न्यूज नेटवर्क
कसबे डिग्रज : कोरोनाच्या संकटात रक्ताच्या नात्याची माणसे दुरावली आहेत, पण ‘त्या’ दोघांनी आयुष्यभराची साथ काय असते, याचा धडा दिला आहे. साठ वर्षीय कोरोनाग्रस्त पत्नीला कोणत्याही परिस्थितीत कोरोनामुक्त करणारच, असा निर्धार करून ७० वर्षीय पतीने कसबे डिग्रजच्या अलगीकरण कक्षात ठिय्या मारला आहे.
कसबे डिग्रज (ता. मिरज) येथील ७० वर्षीय पोपट पांढरे यांच्या पत्नी पुतळाबाई या कोरोनाग्रस्त आहेत. घरात अलगीकरणाची सोय नाही, त्यामुळे शाळेमधील अलगीकरण कक्षामध्ये पोपट पांढरे यांनी पत्नीला दाखल केले. स्वत: निगेटिव्ह असताना देखील पत्नीच्या प्रेमासाठी त्यांनीही बाडबिस्तरा घेऊन शाळेच्या व्हरांड्यात तळ ठोकला आहे. समोरच्या खोलीमध्ये पत्नी असून, औषधोपचार, योग्य आहार सुरू आहे. ‘मी तुझ्यासोबत आहे, काळजी करू नकोस, आपण दोघेही सुखरूप घराकडे जाणारच’, असा आत्मविश्वास देत त्यांनी पत्नीला कोरोनामुक्त केले आहे.
दुष्काळी वर्षात दोघांची लग्नगाठ बांधली गेली.
अनेक सुखदुःखाच्या गोष्टी पाठीवर घेऊन हे कुटुंब संसार करत आहे. पोपट पांढरे पन्नास वर्षांपासून गवंडीकाम करत संसारगाडा चालवत आहेत. एकमेकांसोबत सावलीसारखे राहणाऱ्या या पती-पत्नीने आदर्श समोर ठेवला आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले यांनी या दांपत्याची भेट घेत आधार दिला. या दांपत्याला महिन्याचे धान्य व संसारोपयोगी साहित्य मोफत घरपोच देणार असल्याचे सांगितले आहे.