आष्टा : आष्टा शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या विलासराव शिंदे बहुउद्देशीय हॉलच्या ठिकाणी कोरोना रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती आष्टा शहर विकास आघाडीचे नेते वैभव शिंदे यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की, सध्या कोरोनाचा वाढता प्रसार पाहता आष्टा शहरात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. शहराची लोकसंख्या जास्त असल्याने दाट लोकवस्तीमुळे कोरोना रुग्ण सापडलेल्या ठिकाणी वेगळे राहण्याची सोय नाही. रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांची गैरसोय लक्षात घेऊनच विलगीकरण कक्ष सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आष्टा शहरांमध्ये विलगीकरण कक्षाची मागणी विविध सामाजिक संघटनांनी केली होती. त्यानुसार विलासराव शिंदे बहुउद्देशीय हॉल येथे विलगीकरण कक्ष सुरू करणार आहे. आष्टा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर्स व नर्सेसकडून सकाळी व संध्याकाळी रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. संपूर्ण विलगीकरण कक्ष सीसीटीव्हीच्या कक्षेत असणार आहे, असेही वैभव शिंदे यांनी सांगितले.
यावेळी नगराध्यक्षा स्नेहा माळी, उपनगराध्यक्ष प्रतिभा पेटारे, बाबासाहेब सिद्ध, मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, ग्रामीण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संतोष निगडी, आष्टा नगरपरिषदेचे आरोग्य अधिकारी आर. एन. कांबळे उपस्थित होते.