लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहरातील वसंतदादा शासकीय रुग्णालय आणि मिरज सिव्हिल रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणेत अनेक त्रुटी आहेत. या दोन्ही रुग्णालयांनी अग्निशमनचा परवानाही घेतलेला नाही. त्यामुळे त्यांना नोटीस बजावल्याची माहिती महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे यांनी दिली.
नाशिक आणि विरार येथील दुर्घटनेनंतर शासनाने सर्वच रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर सांगली व मिरज शासकीय रुग्णालयांच्या फायर ऑडिटबाबत महापालिकेकडे विचारणा केली असता अनेक त्रुटी असल्याचे सांगण्यात आले. कांबळे म्हणाले, तीन ते चार महिन्यांपूर्वी दोन्ही रुग्णालयांचे फायर ऑडिट केले होते. त्याचा अहवालही जिल्हाधिकारी यांना तसेच हॉस्पिटलला दिलेला आहे. काही दिवसांपूर्वी नोटीसही दिलेली आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अलार्म सिस्टिम नाही. धूर आल्यानंतर डिटेक्टरवर सिग्नल येतो, पण डिटेक्टरच बसवलेला नाही. अग्निशमन यंत्रणेच्या अनुषंगाने इमारतीवर टाकी व खाली टाकी आणि त्याला पंप असणे आवश्यक आहे. पाइपलाइनला फिक्स फायर इन्स्टॉलेशन आवश्यक आहे. तेही नाही. हॉस्पिटलकडे अग्निशमन सिलिंडर्ससारखी उपकरणे आहेत.
सांगली व मिरज सिव्हिल हॉस्पिटलने अग्निशमन विभागाचा परवानाही घेतलेला नाही. नाहरकत दाखल्यासाठी अर्जही केलेला नाही. अग्निशमनची कोणती यंत्रणा हवी, उपाययोजना कोणकोणत्या राबवायच्या याबाबतची माहिती घेण्यासाठी अर्जही केलेला नाही. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अग्निशमन कायद्यान्वये आवश्यक उपाययोजना नाहीत. उपाययोजनांचा अभाव आहे. त्यासंदर्भातील अहवाल जिल्हाधिकारी यांना दिलेला आहे. नुकत्याच या दोन्ही हॉस्पिटलनाही नोटिसा बजावल्या आहेत. उपाययोजना तातडीने पूर्ण कराव्यात, अशा सक्त सूचना दिल्या आहेत. हॉस्पिटलमध्ये आगीसारखी दुर्घटना घडल्यास हॉस्पिटल प्रशासन जबाबदार असेल, असेही सांगितले आहे, अशी माहिती कांबळे यांनी दिली.