विटा : आळसंद (ता. खानापूर) येथील श्री लिंगेश्वर महाराज समाधी मठाच्या परिसरात असलेल्या विहिरीतील पाण्यात जंतुनाशक पावडर टाकत असताना तोल जाऊन पडल्याने बाळासाहेब मारुती मोहिते (वय ७२, मूळगाव मोहिते-वडगाव, सध्या रा. आळसंद) या लिंगेश्वर महाराज मठातील सेवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी ११ वाजण्यापूर्वी घडली.
कडेगाव तालुक्यातील मोहिते-वडगाव येथील मूळ गाव असलेले बाळासाहेब मोहिते हे वयाच्या १३ व्या वर्षापासून श्री लिंगेश्वर महाराजांचे सेवक म्हणून काम करीत होते. पहिल्यांदा सागरेश्वर अभयारण्यातील लिंगेश्वर मंदिर व त्यानंतर आळसंद येथील महाराजांच्या मठात ते कार्यरत होते. गेल्या ५० वर्षांपासून मोहिते श्री लिंगेश्वर महाराजांचे सेवक म्हणून काम पाहात होते.
रविवारी सकाळी पूजाअर्चा आटोपल्यानंतर मठाच्या आवारात असलेल्या विहिरीतील पाण्यात ते कठड्यावर उभा राहून पाण्यात जंतुनाशक टीसीएल पावडर टाकत होते. यावेळी तोल गेल्याने विहिरीच्या आतील बाजूच्या कठड्यावर डोके आपटून त्यांचा जागीच मृत्यू झाला. मात्र तेथे असलेले लक्ष्मण पांडुरंग कुंभार व अन्य भक्तांनी त्यांना विहिरीत बाहेर काढून विटा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांचा सोळाशी विधी सोमवार, दि. २० रोजी आळसंद येथील श्री लिंगेश्वर मठ समाधी परिसरात होणार आहे. या घटनेने आळसंदसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची नोंद विटा पोलिसांत झाली आहे.
फोटो : ०६ बाळासोा मोहिते