शांतिनिकेतनमध्ये घेण्यात आलेल्या जवानांच्या माहिती संकलन स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम सुभेदार मेजर मोहन सूर्यवंशी यांच्याहस्ते पार पडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सैन्यदलात जाऊन देशसेवा करणे म्हणजे खरी देशभक्ती आहे. सैन्यदलात करिअर होऊ शकतेच, पण त्याने देशभक्तीची संधीही मिळते. त्यामुळे आतापासूनच मन, मेंदू आणि मनगट भक्कम करून सैन्यदलात भरती व्हायचे स्वप्न बघा, असे आवाहन १६ महाराष्ट्र बटालियन एनसीसीचे सुभेदार मेजर मोहन सूर्यवंशी यांनी केले.
लेफ्टनंट जनरल एसपीपी थोरात अकॅडमीच्यावतीने कारगील युध्दातील शहीद आणि शौर्य गाजविलेल्या जवानांची माहिती संकलन स्पर्धा घेण्यात आली होती. त्याचे बक्षीस वितरण सूर्यवंशी यांच्याहस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अकॅडमीच्या इनचार्ज सौ. समिता पाटील होत्या.
सूर्यवंशी यांनी यावेळी मुलांना सैन्यभरतीबाबत माहिती दिलीच, शिवाय काही थरारक प्रसंगही सांगितले. सौ. पाटील यांनीही मुलांना सैन्यदलातील करिअरबाबत गांभीर्याने विचार करावा, असे आवाहन केले.
जीवन मोहिते यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. मोहन कोळेकर यांनी स्पर्धेबाबत माहिती दिली. दादासाहेब सरगर यांनी सूत्रसंचालन केले, तर आभार प्रमोद कुंभार यांनी मानले. मुख्याध्यापक संजय खांडेकर यावेळी उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल अनुक्रमे : लहान गट प्रथम- तन्वी प्रदीप पाटील, दि्वतीय- जान्हवी चंद्रकांत चिगरे, तृतीय- ओंकार भगवान सोनवलकर, उत्तेजनार्थ- प्रणाली श्यामराव यमगर, इरफान झाकीरहुसेन पठाण.
मोठा गट : प्रथम- आलिशा खान, दि्वतीय- निशांत नीलेश चव्हाण, तृतीय- वेदांत उत्तम नांगरे, उत्तेजनार्थ- मयूर माणिकराव माने, प्रणव पांडुरंग सटाले.