लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : इस्लामपुरात दोन शासकीय कोविड रुग्णालये वगळता खासगी १२ कोविड रुग्णालये आहे. यातील बहुतांश रुग्णालयात मुख्य डॉक्टरच नसतात. शिकाऊ कर्मचाऱ्यांकडून अल्प पगारात सेवा करून घेतली जात आहे. त्यामुळे रुग्णांना संकटांना तोंड द्यावे लागते. यामुळे शहर आणि परिसरातील मृत्युदर वाढत चालल्याचे दिसत आहे.
जिल्ह्यातील दहा तालुक्यांंपैकी वाळवा तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा दिल्या आहेत. तेथे मोफत उपचार असल्याने बेड भरलेले असतात. काही कोविड रुग्णालयांत महात्मा जोतिबा फुले आरोग्यदायी योजना सुरू आहे. त्यामुळे तेथेही बेड उपलब्ध नसतात.
शहरातील निम्म्याहून अधिक खासगी कोविड रुग्णालयांचे प्रमुख रुग्णालयात उपस्थित नसतात. संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर त्यांचे मोबाईल ‘नॉट रिचेबल’ असतात, किंवा उचलले जात नाहीत. त्यामुळे शिराळा, वाळवा तालुक्यांतील रुग्णांच्या नातेवाइकांना मनस्ताप सहन करावा लागतो. काही कोविड रुग्णालयांनी क्षमतेपेक्षा जास्त बेडची सुविधा निर्माण केली आहे. मात्र तेथे वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे. रुग्णांवर वेळेवर उपचार होत नाहीत. प्रत्यक्षात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना डॉक्टरांचे वेळेत मार्गदर्शनही मिळत नाही. त्यामुळे रुग्णांच्या उपचारावर परिणाम होत आहे. बहुतांश खासगी रुग्णालयांत स्वच्छतेचाही अभाव आहे. रुग्ण मृत झाला तरी नातेवाइकाला दोन-दोन तास कळविले जात नाही. शिकाऊ कर्मचाऱ्यांकडून अल्प मोबदल्यात कामे करून घेतली जातात. त्यामुळेच रुग्ण बरे होण्याऐवजी दगावल्याचे प्रमाण वाढत आहे.
चौकट
एका रुग्णाच्या नातेवाइकाने शहरातील खासगी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून मिळणारी अपमानास्पद वागणूक, दैनंदिन मूलभूत सुविधांचा अभाव, अशुद्ध पाणी, त्यातच रुग्णालयात असलेली दुर्गंधी, आदींची तक्रार करण्यासाठी डॉक्टरच भेटत नाहीत. मग हे रुग्ण आपली तक्रार सांगणार कोणाला, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
चौकट
ऑक्सिजन पुरवठ्याला विलंब
शहरातील सर्वच रुग्णालयांत ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. याबाबत ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या उद्योजकांशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा वेळेत होत नाही. काहींनी स्वत:चे ऑक्सिजन प्लॅँट बसविले आहेत. परंतु त्यांनाही हाच तुटवडा भासत आहे. रुग्णांवर उपचार करताना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.