सांगली : महापालिका क्षेत्रात मोकाट कुत्र्यांची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. कुत्र्यांच्या नसबंदीसाठी तातडीने सेंटर सुरू करावे, अशी मागणी नागरिक जागृती मंचचे जिल्हाध्यक्ष सतीश साखळकर यांनी केली. याबाबत आयुक्त नितीन कापडणीस यांना निवेदन देण्यात आले.
साखळकर म्हणाले की, शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. ही कुत्री पाळण्याचे आवाहनही करण्यात आले होते. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अनेक अपार्टमेंट, तळघरातील दुकानाच्या दारात कुत्री पिलांना जन्म देत आहेत. त्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. याबाबत मुकादमाशी संपर्क केला असता, पिलांसाठी सुरक्षित जागा नसल्याचे समजते. त्यासाठी महापालिकेने डाॅग फाऊंड तयार करण्याची गरज आहे. कुत्र्यांच्या नसबंदीचे काम ठप्प आहे. महापालिकेने कित्येक वर्षानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. त्यामुळे नसबंदीसाठी अद्यावत शस्त्रक्रिया सेंटर सुरू करावे, अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे.
जिल्ह्यात प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटी अस्तित्वात आहे. जिल्हाधिकारी त्याचे अध्यक्ष आहेत. जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी, प्राणी मित्र सदस्य असलेली ही समिती नेमकी काय काम करते? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.