शेगाव : कोणत्याही परिस्थितीत येत्या चार दिवसांत माडग्याळ येथे कोविड सेंटर उभे करा, अशा सूचना पालकमंत्री जयंत पाटील यांनी केल्या. जत येथील पंचायत समितीच्या सभागृहात आढावा बैठकीत मंत्री पाटील बोलत होते.
मंत्री पाटील म्हणाले की, कोरोनाचे रुग्ण वाढत असून यासाठी कडक जनता कर्फ्यू लागू करणे आवश्यक आहे. यासाठी सरपंच, ग्रामदक्षता समिती यांनी सक्रिय व्हावे. येत्या काही दिवसांत ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होईल. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यावर पोलिसांनी कडक कारवाई तसेच आरोग्य विभागाने त्यांची कोरोना चाचणी करावी. केंद्र सरकारकडून रेमडेसिविर इंजेक्शन्सचा पुरवठा कमी होत असल्याबद्दल आम्ही आवाज उठविल्यानंतर पुरवठा आता जादा होत आहे. लस पुरवण्यासाठी उत्पादक कंपनीशी मुख्यमंत्री चर्चा करत आहेत.
आमदार सावंत म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीत माडग्याळला ऑक्सिजन बेड लवकर उपलब्ध करावेत. प्रशासनाने आता विलंब करू नये. जनता कर्फ्यूबाबत काटेकोर पालन करा. उमदीप्रमाणे जत पोलिसांनी सक्षम होणे आवश्यक आहे.
जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील म्हणाले की, आशा वर्कर्स यांच्यावर काही ठिकाणी दमदाटीचे प्रकार घडत असून त्यांच्यावर कारवाई करावी. पूर्व भागातील नागरिक कर्नाटकात कोरोना चाचणी करतात. चाचणी बाधित आली तरी घरात बसतात,यावर मंत्री पाटील म्हणाले की,ही बाब गंभीर असून यावर कारवाई झाली पाहिजे.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी, प्रांताधिकारी प्रशांत आवटे,तहसीलदार सचिन पाटील, गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर, उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले, पोलीस निरीक्षक हेमंत भोसले, उमदीचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, उपनगराध्यक्ष आप्पा पवार, प्रभाकर जाधव आदी उपस्थित होते.
चाैकट
आम्हाला ऑक्सिजन द्या
विक्रम ढोणे म्हणाले की, सरकारने आम्हाला ऑक्सिजन द्यावा. आरोग्यधिकारी संजय बंडगर हे निष्काळजी असून त्यांचे परिस्थितीवर नियंत्रण नाही. संख येथील १०८ रुग्णवाहिका चालकाअभावी बंद आहे. जत शहराला कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळणे आवश्यक आहे.