आष्टा : आष्टा शहरातील माजी आमदार विलासराव शिंदे बहुउद्देशीय हॉल येथे नगरपालिकेच्यावतीने १०० बेड्सचे मोफत कोविड सेंटर उभारण्यात यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते वीर कुदळे यांनी केली आहे.
आष्टा पालिकेच्या काकासाहेब शिंदे सभागृहात जनता कर्फ्यूबाबत आयोजित बैठकीत बोलताना वीर कुदळे म्हणाले की, आष्टा शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. स्वच्छ सर्वेक्षण अभियानात पालिकेने देदीप्यमान कामगिरी केल्याने पालिकेला दोन कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. या निधीच्या ६० लाख रुपये व्याजातून विलासराव शिंदे बहुउद्देशीय हॉल याठिकाणी १०० बेड्सचे ऑक्सिजन सोयीनेयुक्त सुसज्ज मोफत कोविड सेंटर उभारण्यात यावे. पालिकेची विशेष सर्वसाधारण सभा बोलावून या बैठकीत आष्टा शहरासाठी रुग्णवाहिका व शववाहिका खरेदी करण्यात यावी. प्रत्येक प्रभागात स्वच्छता अभियान राबविण्यात यावे. कोरोना रुग्ण सापडलेल्या ठिकाणी जंतुनाशक औषधांची फवारणी करण्यात यावी.