सांगली : अग्निशामक यंत्रणा बसवल्याच्या कामाचा अंतिम दाखला देण्याच्या मोबदल्यात सव्वालाख रुपयांची लाच स्वीकारताना पकडलेल्या महापालिकेच्या मुख्य अग्नीशमन अधिकाऱ्याच्या घरातून सात लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. विजय आनंदराव पवार (वय ५०, रा. जोशी प्लॉट, संभाजीनगर, सांगलीवाडी) असे संशयिताचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी पवार याला लाच घेताना रंगेहात पकडले होते.अग्निशामक यंत्रणा बसविण्याची कामे करणाऱ्या कंपनीच्या संचालकाने याबाबत तक्रार केली होती. यात तक्रारदाराकडे पवारने दिड लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती सव्वालाख रुपये लाच स्विकारताना ही कारवाई करण्यात आली. टिंबर एरिया येथील अग्नीशमन दलाच्या कार्यालयात सव्वालाख रुपयांची लाच स्विकारताना पवार यास पकडले होते. त्याच्यावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सांगलीवाडीतील पवार याच्या घराची झडती घेतली यात सात लाख १ हजार ६०० रुपयांची रोकड आढळून आली. ही रक्कम जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी पवार यास अटक केली असून, आता न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. अशी माहिती ‘लाचलुचपत’चे उपअधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.
सांगलीत महापालिका अधिकाऱ्याच्या घरात सापडली सात लाखांची रोकड, ‘लाचलुचपत’कडून झडती
By शरद जाधव | Published: June 28, 2023 12:28 PM