सांगली : सर्वसामान्य नागरिकांना अधिक चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने केंद्र शासनाच्या वतीने आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत १३५६ उपचारांकरिता पाच लाख रुपयांचे वैद्यकीय संरक्षण दिले जाते. या योजनेतून जिल्ह्यात आतापर्यंत सात लाख २७ हजार ३५२ आयुष्मान कार्ड काढले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी दिली.डॉ. कदम म्हणाले की, योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्मान कार्ड, आधार कार्ड ही कागदपत्रे आवश्यक आहेत. या योजनेंतर्गत फक्त गोल्डन कार्डसाठी२०११ च्या सर्वेक्षणानुसार सामाजिक, आर्थिक व जातीनिहाय जनगणनेनुसार जिल्ह्यात एकूण १८ लाख ४४ हजार २४ कार्ड काढणे अपेक्षित आहे.
जिल्ह्यातील १३३१ आशा स्वयंसेविकांना लॉगिन आयडी दिले आहेत तसेच आपले सरकार सेवा केंद्र यांच्या आतापर्यंत एक हजार लॉगिन आय डी मिळाल्या आहेत. शहरी भागातील२६३लॉगिन आय डी तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे.हे कार्ड काढण्यासाठी आधार कार्ड घेऊन नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्र, आशा वर्कर्स आणि योजनेच्या मान्यता प्राप्त रुग्णालयास भेट द्यावी. तिथे आयुष्मान-कार्ड निर्माण केले जाईल. त्यानंतर हे कार्ड आशा वर्कर मार्फत आपल्या घरी पोहोच केले जाईल. हे कार्ड मिळाल्यानंतर योजनेच्या मान्यता प्राप्त रुग्णालयात मोफत उपचार मिळणार आहेत.
या योजनेंतर्गत कॅन्सर, हृदयरोग शस्त्रक्रिया, मूत्रपिंड व मूत्रमार्ग विकार शस्त्रक्रिया, मेंदू व मज्जासंस्था विकार, अस्थिव्यंग, जठर व आतडे शस्त्रक्रिया, प्लास्टिक सर्जरी, जळीत, स्त्रीरोग, बालरोग, त्वचारोग, नेत्रशस्त्रक्रिया, कृत्रिम अवयव, फुफ्फुस, आजारावरील उपचार, सांधे प्रत्यारोपण , मूत्रपिंड विकार, मानसिक आजार इत्यादी १३५ ६ उपचारांचा समावेश आहे. तरी सर्वांनी हे कार्ड काढून घ्यावे असे आवाहनही डॉ. कदम यांनी केले आहे.