सांगली : येळावी (ता. पलूस) येथे मशरूमची भाजी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील सात जणांना विषबाधा झाली. सोमवारी ही घटना घडली. त्यांच्यावर सांगलीत शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.या घटनेने येळावीमध्ये खळबळ उडाली. नातेवाईक व ग्रामस्थांनी धावपळ करत रुग्णांना सांगलीत शासकीय रुग्णालयात दाखल केले, त्यामुळे त्यांच्या जीवावरील संकट टळले. या शेतकऱ्याची गावात द्राक्षबाग आहे. बागेत दोन सरींमध्ये त्याने मशरूमची लागवड केली आहे. द्राक्ष आणि मशरूम याचे दुहेरी उत्पन्न घेण्यासाठी हा प्रयोग केला आहे. सध्या मशरूम काढणीस आले आहे. काल शेतकऱ्याने थोडे मशरूम घरी आणले. रात्रीच्या जेवणासाठी त्याची भाजी केली. शेतकरी दांपत्य, त्यांची मुले व अन्य कुटुंबीय अशा सात जणांनी भाजी खाल्ली.काही वेळानंतर सर्वांची प्रकृती बिघडली. उलट्या, जुलाब, चक्कर मारणे असा त्रास सुरू झाला. गावात स्थानिक डॉक्टरकडे उपचार घेतले; पण प्रकृतीत सुधारणा न झाल्याने सांगलीला शासकीय रुग्णालयात दाखल केले. मशरूम खाण्याने त्यांना विषबाधा झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. डॉक्टरांनी तातडीने उपचार केल्यानंतर सर्वजण धोक्याबाहेर आले. त्यांच्यावर अद्याप उपचार सुरू आहेत.
द्राक्षाच्या औषधांमुळे मशरूम बनले विषारीद्राक्षबागेत नियमितपणे औषध फवारणी केली जाते. यातील काही औषधे तीव्र प्रमाणात विषारी असतात. त्याचेच फवारे मशरूमवर पडले असावेत आणि त्यातून ते विषारी बनले असावेत, अशी शक्यता आहे. भाजी बनविण्यापूर्वी मशरूम धुतले, तरी त्यातील विषारीपणा गेला नसावा.