सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जिल्ह्यासाठी सात रुग्णवाहिका मंजूर केल्या असून, आठ दिवसात त्या दाखल होणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदच्या अध्यक्ष प्राजक्ता कोरे यांनी दिली. जिल्हा परिषद आणखी तीस रुग्णवाहिका खरेदी करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
कोरे म्हणाल्या, ‘‘शासनाकडून आठ दिवसात सात रुग्णवाहिका मिळणार आहेत. त्या कडेगाव तालुक्यातील खेराडेवांगी, शिराळा तालुक्यातील चरण, तासगाव तालुक्यातील सावळज, वाळवा तालुक्यातील बावची, चिकुर्डे, खानापूर तालुक्यातील लेंगरे प्राथमिक आरोग्य केंद्रांना देण्यात येणार आहेत. याशिवाय, अन्य आरोग्य केंद्रांनाही रुग्णवाहिकांची गरज आहे. तेथे नवीन रुग्णवाहिका देण्यासाठी तीस रुग्णवाहिका खरेदी करण्यात येणार आहेत. त्यासाठीची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून, येत्या महिन्यात तीस रुग्णवाहिका उपलब्ध होणार आहेत.’’
चौकट
डॉक्टर, आरोग्य सेविकांची भरती
जिल्हा परिषदेने डॉक्टर, आरोग्य सेविकांची पदे तत्काळ भरण्यासाठी भरती प्रक्रिया चालू केली आहे. २५ बीएएमएस, शंभर आरोग्य सेविकांची पदे तत्काळ भरणार आहे. चार दिवसात अर्जाची छाननी करून संबंधिताना नियुक्ती दिली जात आहे, असेही प्राजक्ता कोरे यांनी सांगितले.