सांगली : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची (एमआयडीसी) नवी सात प्रादेशिक कार्यालये सुरु करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. तेथे ९२ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसही हिरवा कंदील दर्शविण्यात आला आहे.यासंदर्भातील अध्यादेश उद्योग मंत्रालयाने ४ जुलैरोजी जारी केला. त्यानुसार सातारा, सोलापूर, बारामती, अहमदनगर, जळगाव, अकोला व चंद्रपूर येथे प्रादेशिक कार्यालये सुरु करण्यात येणार आहेत. यानिमित्ताने तेथील औद्योगिक विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. उद्योजकांच्या प्रशासकीय कामकाजासाठी त्यांना पुणे किंवा मुंबई मुख्यालयात हेलपाटे मारण्याची गरज उरणार नाही. राज्यातील वाढत्या औद्योगिकरणाच्या तुलनेत प्रादेशिक कार्यालयांची संख्या अत्यंत कमी आहे. काही ठिकाणी दोन-तीन जिल्ह्यांसाठी एकच प्रादेशिक कार्यालय आहे. तेथील मनुष्यबळही कमी आहे. त्यामुळे कामाचा ताण वाढला असून विविध कामांसाठी हेलपाटे मारावे लागत असल्याचे उद्योजकांनी शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते. त्यामुळे नव्याने सात प्रादेशिक कार्यालयांच्या निर्मितीचा निर्णय उद्योग मंत्रालयाने घेतला.प्रत्येक कार्यालयासाठी प्रादेशिक अधिकारी, व्यवस्थापक, क्षेत्र व्यवस्थापक, उपरचनाकार, प्रमुख भूमापक, सहायक क्षेत्र व्यवस्थापक, सहायक, लिपिक टंकलेखक, वाहनचालक व शिपाई अशी पदे भरण्यास मंंजुरी देण्यात आली आहे.
सातारा, सोलापूर, बारामती, जळगावसह सात नवी एमआयडीसीची प्रादेशिक कार्यालये
By संतोष भिसे | Published: July 09, 2024 5:35 PM