सांगली : जिल्हा परिषदेने महावितरणच्या व्यावसायिक वीज बिलाच्या बोजातून सुटका करून घेण्यासाठी बारा प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये दीड कोटीचा खर्च करून सौरऊर्जा प्रकल्प बसविले, मात्र सध्या केवळ पाच चालू असून, उर्वरित सात प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अंधार आहे. तरीही पुरवठादार कंपनीचे दुर्लक्ष आहे.ग्रामीण भागामध्ये विजेचा प्रश्न गंभीर आहे. महावितरण कंपनीकडून शाळा, आरोग्य केंद्रे या सामाजिक संस्था असतानाही त्यांना व्यावसायिक दराने वीज बिल आकारणी केली जात आहे. याला पर्याय म्हणून जिल्हा नियोजन विभागाकडून नावीन्यपूर्ण योजनेतून सौरऊर्जा प्रकल्प सुरु करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली. जिल्हा परिषद कृषी विभागाच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये बारा प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मंजुरी दिली. एकासाठी १३ लाख रुपयांचा खर्च आला आहे. वेदांत या कंपनीने उपकरणे बसवली. बारापैकी कुरळप, येळावी, मणदूर, कुंडल, हिंगणगाव, नेवारी आणि मणेराजुरी येथील उपकरणे सध्या बंद आहेत. ती सुरू करण्यासाठी वेदांत कंपनीला वारंवार सूचना देऊनही त्यांच्या प्रशासनाने कोणतीही दाद दिली नाही. यामुळे काही प्राथमिक आरोग्य केंद्रातील उपकरणे गेल्या काही महिन्यांपासून बंदच आहेत. या प्रश्नावर जिल्हा परिषद सदस्यांनी सभांमध्ये आवाजही उठविला होता. कंपनीला काळ्या यादीत टाकून त्यांच्या अनामत रकमेतून उपकरणे दुरूस्तीचा निर्णय झाला होता. पण, त्या निर्णयाची प्रशासनाकडून अंमलबजावणीच झाली नाही. यामुळे आरोग्य केंद्रामध्ये सौरऊर्जा उपकरणे असूनही वीज बिलाचा लाखो रुपयांचा बोजा सहन करावा लागत आहे. (प्रतिनिधी)
आरोग्य केंद्रातील सौरऊर्जेची सात युनिट बंद
By admin | Published: July 16, 2016 11:25 PM