सांगली : पारे रोड, विटा (ता. खानापूर) येथील एका ग्राहकाने खडी क्रशिंग प्रकल्पासाठी वीजमीटरमध्ये फेरफार करून १७ लाख ५५ हजार ७२१ रुपयांची वीजचोरी केली. वीज चोरीप्रकरणी विलास एकनाथ कदम यांच्याविरुद्ध इस्लामपूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणच्या पथकाने ही कारवाई केली आहे.विटा येथील वीजग्राहक विलास कदम यांच्या खडी क्रशिंग प्रकल्पाच्या वीज मीटरची पंचासमक्ष तपासणी केली होती. केबलच्या आर. वाय. बी. फेजच्या वायर्स मीटरला जोडलेल्या होत्या. मात्र, केबलची न्यूट्रल वायर अधांतरी असल्याचे दिसून आले. ग्राहकाकडून मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी केल्याचे दिसून आले. मीटर सीलही शंकास्पद दिसून आले. त्यानंतर पंच व ग्राहक प्रतिनिधीसमक्ष वीज मीटर सील केले.
मीटर वीज वापरापेक्षा कमी गतीने रीडिंग नोंदवित असल्याचे निदर्शनास आले. ऑगस्ट २०१९ ते १९ नोव्हेंबर २०२१ महिने आणि जून २०२२ ते ऑक्टोबर २०२२ हे पाच महिने अशी एकूण ३३ महिन्यांत ग्राहकाने एक लक्ष पाच हजार ३५८ युनिटची वीज चोरी केली आहे. या ग्राहकाच्या वीज चोरीच्या युनिटची १७ लाख ५५ हजार ७२१ रुपये रक्कम आहे. नोटीस देऊनही वीज बिल भरले नसल्याने महावितरणने गुन्हा दाखल केला आहे. भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता महेशकुमार राऊत, सहायक सुरक्षा व अंमलबजावणी अधिकारी चैत्रा पै, वरिष्ठ तंत्रज्ञ वसंत सकटे, अमित नारे यांनी ही कारवाई केली.वीज चोरी थांबवा!जिल्ह्यातील वीजग्राहकांनी कोणत्याही प्रकारे वीज चोरी करू नये, अन्यथा महावितरणच्या भरारी पथकातर्फे कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा महावितरणचे अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर यांनी दिला आहे.