सांगली : कोरोना काळात एसटीतून प्रवास करणाऱ्यांची सतराशे साठ कारणे आणि बहाणे ऐकायला मिळत आहेत. सध्या फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच बससेवा सुरू असली तरी, काही ठिकाणी सर्वसामान्य प्रवासीदेखील घुसखोरी करत आहेत. त्यांना थोपवेपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांची पुरेवाट होत आहे.
लॉकडाऊनमध्ये जिल्हाबंदी लागू असल्याने प्रवाशांची संख्या अत्यल्प आहे. सामान्य प्रवाशांना अत्यावश्यक कारणाशिवाय जिल्ह्याबाहेर प्रवासाला बंदी आहे. ई-पास असेल तरच एसटीत प्रवास दिला जातो. प्रत्येक प्रवाशाकडे ओळखपत्र व पासची विचारणा केली जाते. त्यातूनही काही प्रवासी घुसखोरी करतात. प्रवासासाठीची त्यांची कारणे मात्र न पटण्यासारखी व अनेकदा हास्यास्पद असतात. अंत्यसंस्काराला निघालोय, आजारी जावयाला भेटायला निघालोय, कोर्टात तारीख आहे, पोलीस ठाण्यात बोलावलेय, लेक आजारी आहे, कलेक्टर ऑफिसमध्ये अर्जन्ट काम आहे... अशी सतराशे साठ कारणे दिली जात आहेत. एव्हाना वाहकांनादेखील याची सवय होत आहे.
अनेेकदा प्रवासी पुराव्यासाठी पिशवीमध्ये रुग्णालयाची कागदपत्रे, फाईल ठेवतात. कोर्टाची जुनी पत्रे दाखवितात. यातूनही निभाव लागला नाही, तर वाहकाशी हातवारे करत वाद घालण्यापर्यंत मजल जाते.
एसटी कर्मचाऱ्यांसाठी असे प्रवासी मोठी डोकेदुखी ठरत आहेत. ई पासशिवाय किंवा ओळखपत्राशिवाय प्रवासी घेऊ नका, अशा कडक सूचना अधिकाऱ्यांनी वाहकांना दिल्या आहेत. अशावेळी रुग्णालयात तब्येत दाखविण्यासाठी निघालोय, असे सांगणाऱ्या प्रवाशाला अडविण्याचा धोकाही पत्करून चालत नाही, असे वाहकांनी सांगितले.
चौकट
सांगली-कोल्हापूर मार्गावर गर्दी
सांगली-कोल्हापूर व सांगली-इचलकरंजी मार्गांवर नेहमीच भरभरुरून एसटी धावतात. यामध्ये शासकीय नोकरदार, बॅंक कर्मचारी, शिक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे. लगतचे जिल्हे असल्याने पाहुणेरावळ्यांचे प्रमाणही जास्त आहे. व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास करणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून वैद्यकीय उपचारांसाठीही शेकडो प्रवासी सांगली जिल्ह्यात दररोज येत असतात.
चौकट
अंत्यविधी, रुग्णालयाची सर्रास कारणे
- अंत्यविधी, वैद्यकीय उपचार, आजारी नातेवाईकाला भेटायला निघालोय... ही कारणे सर्रास सांगितली जात आहेत. पोलीस ठाणे, न्यायालय, जिल्हा परिषदेत महत्त्वाचे काम आहे... ही कारणेदेखील वाहकांना ऐकावी लागत आहेत.
- वाहकाने अधिक चौकशी केली, तर पुराव्यासाठी पिशवीत कागदपत्रेही ठेवली जातात. कोर्टाचे एखादे जुने पत्र, रुग्णालयाची फाईल, जिल्हा परिषदेचे एखादे पत्र दाखविले जाते.
- शासकीय सेवेतील अनेक कर्मचारी १५ टक्के उपस्थितीच्या अटीमुळे घरातच आहेत. पण शासकीय ओळखपत्र दाखवून वैयक्तिक कारणासाठी जिल्ह्याबाहेर प्रवास करत असल्याचे अनुभवदेखील वाहकांनी सांगितले.
- शेजारच्या जिल्ह्याच्या हद्दीत शेती असल्याचे सांगत प्रवास करणारे तथाकथित शेतकरीही एसटीमध्ये भेटत आहेत.
चौकट
चक्क दारू आणि मटक्यासाठी प्रवास
जिल्ह्यातील काही छोट्या गावांत दारू आणि मटक्यासाठी लोकांचा एसटीचा प्रवास सुरू असल्याचे चकित करणारे अनुभव एसटी कर्मचाऱ्यांनी घेतले. या गावांत दारूबंदी असल्याने शेजारच्या मोठ्या गावांत जाऊन हे महाभाग तलफ भागवतात. परतताना पाच-पन्नास रुपयांचा मटकादेखील लावतात. या भागात संध्याकाळच्या गाड्यांमध्ये अशाच प्रवाशांची गर्दी असते, असा अनुभव आहे.
पॉईंटर्स
जिल्ह्यातील एकूण आगार - १०
बसेस चालविल्या जातात - ४५
प्रवास करणाऱ्यांची संख्या - ८००
कोट
एसटीमध्ये फक्त अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना घेण्याच्या सूचना वाहकांना दिल्या आहेत. सर्वसामान्य प्रवाशाकडे ई पास असेल तरच प्रवेश दिला जातो. सध्या सांगली-कोल्हापूर व सांगली-इचलकरंजी मार्गांवर अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांची गर्दी आहे. प्रवासीच नसल्याने एसटीच्या फेऱ्या कमी केल्या आहेत.
- दीपक हितांबे, कनिष्ठ आगार व्यवस्थापक, सांगली