लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : पूरग्रस्त सांगलीच्या स्वच्छतेसाठी राज्यभरातील महापालिका, सामाजिक संघटना मदतीला धावून येत असताना येथील सावली निवारा केंद्रातील बेघरही स्वच्छतेसाठी रस्त्यावर उतरले. त्यांनी शनिवारी राबविलेल्या या मोहिमेत १ टन कचरा संकलन केला.
महापुरात निम्मी सांगली पाण्याखाली गेली होती. पूर ओसल्यानंतर प्रशासनाकडून युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर पुणे आणि मुंबई महापालिकेची टीमही सांगलीत दाखल झाली आहे. अशातच येथील सावली बेघर निवारा केंद्रातील ५० बेघरांनी स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला. हरिपूर रस्ता, गावभाग, गणपती पेठ, सराफकट्टा, कापडपेठ परिसरात मोहीम राबवित सुमारे एक टन कचरा संकलन केला.
महापालिका व इन्साफ फौंडेशन संचलित सावली बेघर निवारा केंद्रात सध्या ६९ बेघरांना हक्काचा निवारा दिला जात आहे. या बेघरांनाही इतरांप्रमाणे जगता आले पाहिजे, यासाठी संस्थापक मुस्तफा मुजावर यांनी विविध उपक्रम या ठिकाणी राबविले आहे. काही बेघरांना स्वयंरोजगारासाठी छोटे व्यवसायही सुरू करून देण्यात आले आहे. त्यातून त्यांची उपजीविका होते. संकट काळात मदतीसाठी नेहमीच अग्रसेर असणारी ही संस्था महापुरातही पुढे आली आहे. मुजावर यांच्या पुढाकारातून बेघरांकडून स्वच्छता मोहीम राबविण्याची संकल्पना पुढे आली.
त्यानुसार सुमारे पन्नासभर बेघरांना सहभागी करून हरिपूर रस्ता, कापडपेठ, गणपतीपेठ, गावभाग परिसरात हाती खराटा घेऊन ही मंडळी धावली. प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून या मंडळींनी काम केले. एका दिवसात सुमारे एक टन कचरा संकलन करण्यात आले. बेघरांनी घेतलेल्या या पुढाकाराचे आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त राहुल रोकडे, स्मृती पाटील यांनी कौतुक केले. पुढील टप्प्यात ही मोहीम सुरूच राहणार असल्याचे मुस्तफा मुजावर यांनी सांगितले. स्वच्छता मोहिमेत इन्साफ फाऊंडेशनचे नितीन पाटील, अमोल कदम, केंद्र व्यवस्थापक ज्योती सरवदे, संतोष कदम आदी सहभागी होते.