लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : इस्लामपूर नगरपालिकेतील पूर्वीच्या आणि आताच्या सत्ताकारणातून राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील आणि विकास आघाडीचे उपाध्यक्ष वैभव पवार यांच्यामध्ये पुन्हा जोरदार खडाजंगी झाली. पालिकेच्या ऑनलाईन सभेतही विषय सोडून एकमेकांची उणी-दुणी काढल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला. पाटील आणि पवार यांच्यामधील कलगीतुरा मात्र आगामी निवडणुकीमधील टोकाच्या संघर्षाचे संकेत देऊन गेला.
पालिकेची आज ऑनलाईन सभा झाली. सत्तारुढ विकास आघाडी, शिवसेना आणि विरोधी राष्ट्रवादीचे सदस्य सभेत सहभागी होते. विकासकामांच्या विषयावरून शहाजी पाटील यांनी वादाची ठिणगी उडवून दिली. जानेवारीपासून १५ कोटींच्या विकासकामाबाबत मी पाठपुरावा करतोय, मात्र तुमच्याकडून ठराव झाले नाहीत, असा आरोप केला. त्याला उत्तर देताना विक्रम पाटील यांनी तत्कालीन बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी २० कोटींचा निधी इस्लामपूर शहरासाठी देण्याचे पत्र दिले होते. त्यावेळी राष्ट्रवादीकडून त्याला विरोध झाला, असा पलटवार केला. नगराध्यक्ष पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांचे हे पत्र बांधकाम विभागाकडे असल्याचे खात्रीपूर्वक सांगितले. याच दरम्यान शहाजी पाटील यांनी गेल्या साडेचार वर्षांपासून सुडाचे राजकारण चालल्याने गाव नासले आहे, असा आरोप केला.
या गदारोळात वैभव पवार यांनी उडी घेत शहाजी पाटील यांना उद्देशून ३१ वर्षांत तुम्ही काय केले? काय दिवे लावले? हे सगळ्या शहराला माहीत आहे. ३१ वर्षांत टेंडर कुणाला मिळाले आणि कुणाचे उत्पन्न वाढले. तुमची घाण काढण्यात साडेचार वर्षे गेली, अशा शब्दात हल्ला चढविला. त्यावर शहाजी पाटील यांनी ‘तुम्ही कामावर जाता आणि तोडपाणी करता’ असा प्रतिहल्ला चढवत ३१ वर्षांत काय झाले? हे शहराला माहीत आहे, असे स्पष्ट केले. या सर्व वातावरणामुळे व्यथित झालेल्या बांधकाम सभापती सुनीता सपकाळ यांनी प्रत्येक सभेला दंगाच ऐकायचा का? कामावर काय बोलायचे आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित करत नाराजी व्यक्त केली.