सांगली : दिल्लीतील शाहिनबागच्या धर्तीवर येथील स्टेशन चौकात गेले ३२ दिवस सुरू असलेल्या आंदोलनाला मार्गदर्शन करण्यासाठी दिल्लीच्याआंदोलनातील चार प्रमुख नेते शनिवारी सांगलीत येत आहेत. सायंकाळी सहा वाजता ते आंदोलनस्थळी भेट देऊन एनआरसी व सीएएह्णविरोधातील भूमिका मांडणार असल्याचे संयोजन समितीने पत्रकार बैठकीत सांगितले.दिल्ली विद्यापीठाच्या स्वाती खन्ना, असोसिएशन आॅफ मुस्लिम इंटिलेक्च्युअल मुस्लिमचे टी. एम. जियाऊलहक, आॅल आसाम अल्पसंख्याक विद्यार्थी संघाच्या सचिव हसिना अहमद, जेएनयू विद्यापीठाच्या विद्यार्थी चळवळीतील सक्रिय कार्यकर्त्या अमृता पाठक हे चौघे सांगलीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येत आहेत.याबाबत संयोजन समितीचे अय्याज नायकवडी, उमर गवंडी, आयुब पटेल म्हणाले, एनआरसी, सीएएला देशभरातून विरोध होत आहे. दिल्लीतील शाहिनबाग हे या आंदोलनाचा केंद्रबिंदू आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ सांगलीच्या स्टेशन चौकातील वसंतदादा पुतळ्यासमोर गेल्या बत्तीस दिवसांपासून आंदोलन सुरू आहे.
या आंदोलनाला वसंतबाग असे नाव दिले आहे. हे आंदोलन मुस्लिम महिलांनी हातात घेतले असून, रोज हजारो महिला सायंकाळी येथे जमून सरकारचा निषेध करीत आहेत. सर्व धर्मनिरपेक्ष, पुरोगामी विचारसरणीचे कार्यकर्ते व सर्व समाजघटकांतून त्याला पाठिंबा मिळत आहे.राज्य व देशपातळीवरील ६४ नेत्यांनी प्रत्यक्ष आंदोलनाला भेट दिली आहे. आंदोलनाची दखल शाहिनबागनेही घेतली आहे. तेथे सांगलीतील आंदोलनाचे लाईव्ह प्रक्षेपणही दाखविण्यात आले. शाहिनबाग आंदोलनातील चौघेजण शनिवारी सांगलीत येऊन पाठबळ देणार आहेत.
आंदोलनाचा लढा नगरसेविका वहिदा नायकवडी, रईसा रंगरेज, हवा आपाजान, शुभांगी साळुंखे, जयश्री पाटील, रेहाना शेख, सुलताना बेगम, बतुल शेख, आसमा फकीर आदी महिलांनी आक्रमक बनविला आहे. या आंदोलनास जिल्ह्यातील अनेक पक्ष व संघटनांनीही पाठींबा दिला आहे, असेही त्यांनी सांगितले.यावेळी शहानवाज फकीर, जाफर शेख, मुनीर मुल्ला, इरफान शिकलगार, दाऊद ताशीलदार, यासीनखान पठाण, साहील खाटिक, इरफान शेख, वसीम बलबंड, शोएब पन्हाळकर, आक्रमक शेख आदी उपस्थित होते.