सांगली: हिंदू अध्यात्मिक परंपरेचा अवमान केल्याप्रकरणी सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराज भाजीपाला संघटना व वारकरी संप्रदायाशी संबंधित महिलांनी बुधवारी शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या प्रतिमेवर शाई व जोडे फेकण्याचे आंदोलन केले.
सांगलीच्या मारुती चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी महिलांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, श्रीमद् भगवद्गीता हा हिंदू धर्माचा मुख्य ग्रंथ आहे. वारकरी सांप्रदायामध्ये सामाजिक, आर्थिक व नैसर्गिक विषमता याला फाटा देऊन प्रेम व भक्तिला समाविष्ट केले आहे. अशा या महान परंपरेवर सुषमा अंधारे यांनी विकृत मानसिकतेतून चिखलफेक करण्याचा प्रयत्न केला आहे. हनुमंत व रामायणातील प्रसंगांची खिल्ली उडविणारे वक्तव्य केले आहे. यामुळे समस्त नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत.
सुषमा अंधारे या जाणीवपूर्वक तेढ निर्माण करून सामाजिक अशांतता पसरवण्याचे काम करीत आहेत. आम्ही त्यांचा धिक्कार करीत आहोत. अंधारे यांच्या विरोधात आम्ही फौजदारी गुन्हा दाखल करणार आहोत. त्या जेव्हा सांगलीत येतील तेव्हा त्यांचे स्वागत सांगलीतील महिला चपलांनी करतील, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. आंदोलनात रेखा पाटील, शुभम चव्हाण, रवींद्र वादवणे, जयश्री भोसले, मंगल माळी, शोभा माळी, आशा कोकरे, दीपक कांबळे आदी उपस्थित होते.